वर्षाच्या 365 दिवसात 441 बैठकांचा गुरूकुल मंडळाने हिशोब मागितला

नगर – शिक्षक बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी सभासदांना प्रतिज्ञापत्र देत भ्रष्टाचार करणार नाही, अशी हमी दिली होती. वर्षातून फक्त 14 बैठका होतील. त्या व्यक्तिरीक्त कोणत्याही उपसमित्यांच्या बैठका होणार नाही. काटकसरीचा कारभार करताना याच सत्ताधाऱ्यांनी वर्षातील 365 दिवसांपैकी 441 बैठका घेण्याचा पराक्रम दाखविला आहे. बॅंक अध्यक्षांच्या “दबंगगिरी’तूनच या बैठका झाल्या आहेत. त्या नेमक्‍या कोठे आणि कधी झाल्या याचा तालमेळ मिळत नाही.

हा अजब-गजब पराक्रमावर गेल्यावर्षीच्या तुलनेत सातपटीने खर्च झाला आहे. या खर्चाचा हिशोब सभासदांना मिळत नाही आणि सत्ताधाऱ्यांना देता येत नाही. हा पराक्रम झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सभासदांवर हुकुमशाही सुरू केली आहे. या वार्षिक सभेत पोलीस बळाचा वापर करून सभासदांचा आवाज दाबला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या या प्रकाराविरोधात रिझर्व्ह बॅंक, जिल्हा उपनिंबधक, सहकार विभागाचे मुख्य सचिव आणि न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती गुरूकुल मंडळाच्या नेत्यांनी दिली.

बॅंकेचे अध्यक्ष तथा गुरूमाऊलीचे नेते रावसाहेब रोहकले यांनी सभासदांच्या आग्रहामुळे संचालक मंडळाने प्रवासभत्ता घेण्यास सुरूवात केली आहे, असा दावा केला आहे. रोहकले यांनी त्या सभासदांची नावे जाहीर करावीत.
– संजय कळमकर, गुरूकुल नेते

विकास मंडळाला सभासदांच्या ठेवीतून एक दमटीही घेऊ देणार नाही. विकास मंडळाला पूर्वी एक हजार रुपयांच्या ठेवी अशाच दिल्या होत्या. निवृत्तांना त्या ठेवी आणि त्यावरील व्याज अजूनही दिलेले नाही. विकास मंडळाच्या इमारतीचा ऑडिट रिपोर्ट द्यावा.
– रा. या. औटी,शिक्षक

रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध असताना देखील नेवासा शाखेच्या नुतनीकरणावर 23 लाख रुपयांची मंजुरी कशी? या कामाचा ठेका जुन्याच ठेकेदाराला का? या रकमेत नवीन इमारत उभी राहू शकते. या ठेक्‍याचा हिशोब सत्ताधाऱ्यांना द्यावाच लागेल.
– संजय धामणे,शिक्षक

शिक्षक बॅंकेच्या सभेत प्रत्येक सभासदाला बोलण्याचा अधिकार आहे. तो आवाज पोलीस बळाने दाबला जाणार नाही. सभासद नसते, तर बॅंक नसती आणि रावसाहेब रोहकले अध्यक्ष झाले नसते. सभासदांमुळे उभी असलेल्या बॅंकेत “दबंगगिरी’ खपवून घेणार नाही.
– सुदर्शन शिंदे , शिक्षक

मंडळाचे नेते संजय कळमकर, रा. या. औटी, संजय धामणे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, शिवाजी रायकर, सीताराम सावंत, कल्याण राऊत आदीं पत्रकार परिषदे वेळी उपस्थित होते. औटी म्हणाले, “गुरूमाऊली मंडळाचे तीनतेरा झाले आहेत. बॅंकेतील विश्‍वासघातकी कारभारावर गुरूमाऊलीच्या नेत्यांचाच विश्‍वास राहिलेला नाही.

संचालक मंडळ आणि नेते वेगवेगळा कारभार करत आहेत. यात बॅंकेचे नुकसान होत आहे. प्रवासभत्त्यातून संचालक मंडळांचे हात भरलेले आहे. त्याचा ओघळ काहींनी मंडळाच्या नेत्यापर्यंत जाऊ दिलेला नाही. गुरूमाऊलीमध्ये यातूनच धुसफूस चालू आहे. ही सावरासावरी करण्याचा आता बालिश प्रयत्न बॅंकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले करत आहेत. यातून सभासदांचा आवाज दाबण्यासाठी त्यांनी “दबंगगिरी’ सुरू केली आहे.

वार्षिक सभेत पोलीस बळाचा वापर करण्याची भाषा करत आहेत. ही “दबंगगिरी’ मूळ मुद्यापासून सभासदांचे लक्ष विचलीत करण्यासाठी आहे. सत्ताधाऱ्यांची ही हुकुमशाही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही.’ रावसाहेब रोहकले यांना आरामाची गरज आहे. मलिदा खाण्याच्या नादात त्यांना आरामाचा विसर पडलेला आहे. परिणामी त्यांचे मानसिक तोल ढासळत चालला आहे. सभासदांची बाजू ऐकूण घेण्याची ताकद त्यांच्यात यामुळेच राहिलेली नाही, असेही औटी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)