मनुवादी सरकार घालवा : छगन भुजबळ

श्रीगोंदे – ‘मनुवाद्यांकडून पाच हजार वर्षे माणसांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक देण्यात आली. वर्णभेद वाढवून स्रीया, बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवले. बहुजनांना संपत्ती साठविण्याचीदेखील मुभा दिली नाही. पुन्हा एकदा मनुवादी सरकार येऊ पाहत आहे. मनुवादी सरकार घालवा’, असे आवाहन समता परिषदेचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. यावेळी भुजबळ यांनी मंचासमोर मनुग्रंथ जाळून मनुवादी विचारांचा निषेध करून यापुढे प्रत्येक सभेत मनुग्रंथ जाळणार असल्याचे सांगितले.

श्रीगोंदे शहरात बुधवारी सायंकाळी भुजबळ यांचा नागरी सत्कार व समता मेळावा पार पडला. यावेळी भुजबळ यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. भुजबळ म्हणाले, ‘अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सरकारमध्ये आले. मोदींच्या कार्यकाळात काळ्या पैशावाले परदेशात पळून गेले, राष्ट्रीय बॅंका अडचणीत आल्या, साहेबांचं लग्न फेल, चहाचा धंदा फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटबंदी फेल, राफेल फेल असे म्हणत दिल्लीच्या साहेबांचं सगळं फेल झालं आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भुजबळ म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांना मी अडचणीचा ठरेल म्हणून मला आतमध्ये बसवले. खोटेनाटे आरोप करीत माझ्या घरांवर सतरा वेळा धाडी टाकल्या. सरकारच्या कारनाम्यामुळे मला अतिशय वाईट परिस्थितीमधून जावे लागेल. मात्र तरीही मी थांबणार नाही, माझी लढाई सुरूच राहील.

भुजबळ पुढे म्हणाले, जिथे अन्याय होत असेल, तिथे आदेशाची वाट पाहू नका. बंड करा, मला धमकीचे पत्र आले, मात्र अशा गोष्टींना मी घाबरत नाही. कार्यकर्त्यांनीदेखील विचलित होऊ नये. घटना जाळणाऱ्यांवर एकही गुन्हा दाखल होत नाही, मात्र मनुग्रंथ जाळला की लगेच गुन्हे दाखल केले जातात. यावेळी भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.

आमदार राहुल जगताप म्हणाले, ‘भुजबळ साहेबांच्या माध्यमातून नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. भुजबळ साहेबांनी सर्वसामान्यांना ताकद घेण्याची भूमिका घेतल्याने त्यांना अडचणीत आणले; मात्र सरकारला त्यांच्यावरील आरोप सिद्ध करता आला नाही. साहेबांमध्ये नाकर्त्या सरकारला उलथवून टाकण्याचे सामर्थ्य आहे’. आ. जगताप म्हणाले, माजी मंत्री पाचपुते यांनी गावांमध्ये बैठका घेऊन सभेत अडचणी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र पाचपुतेंच्या हाताने भुजबळ साहेबांसारखा सूर्य झाकणार नाही.

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, ‘भुजबळसाहेब निर्दोष असल्याचा सर्वांना विश्वास आहे. राज्यातील सर्व समाज भुजबळसाहेबांच्या पाठिशी उभा आहे. तालुक्‍यातील आमची आघाडी, येत्या काळातदेखील कायम ठेवून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्यामागे ताकद उभे करण्याचे काम करू’ असेही ते म्हणाले. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, अंबादास गारुडकर, उमेश परहर, तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के, संगीता खामकर, शंकर भुजबळ, अर्चना गोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)