साईबाबा संस्थान अध्यक्षांचे वाहन फोडले

संतप्त ग्रामस्थांवर पोलिसांचा लाठीमार; हल्लेखोरांना घेतले पोलिसांनी ताब्यात

शिर्डी – शिर्डीतील विकास कामांना साईबाबा संस्थानकडून निधी मिळण्यास विलंब होतो, मात्र अन्यत्र साईबाबांच्या झोळीतील पैशाची साईसंस्थान उधळपट्टी करीत असल्याने संतप्त झालेल्या शिर्डी ग्रामस्थांनी अचानक दंडुके मोर्चा आंदोलन उभारून साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्यावरून निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमध्ये पोलिसांनी ग्रामस्थांवर लाठीमार केला. त्यावेळी पोलिसांनी वाहनावर हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, शिर्डी पोलिसांनी ग्रामस्थांचा आक्रमकपणा लक्षात घेता त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. या घटनेची वार्ता पसरताच आणखी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांचा जमाव शिर्डी पोलीस ठाण्याकडे चालून आला. त्यांनी रास्ता-रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी तो हाणून पाडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. दरम्यान साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या वाहनावर केलेल्या हल्ल्याचा शिर्डी शहर भाजपने निषेध केला.

या घटनेमुळे काही काळ तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आता तणाव निवळला असुन शहरात शांततेचे वातावरण आहे. जोपर्यंत साईबाबा संस्थान शिर्डी ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही जामीन घेणार नाही, जेलमध्ये बसुन उपोषण करणार, या दरम्यान प्रकृती बिघडली तर वैद्यकीय उपचार घेणार नाही, होणाऱ्या परिणामास साईबाबा संस्थान विश्‍वस्त जबाबदार राहील, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला.

साईबाबा संस्थानने दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी पन्नास कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कर्मचाऱ्यांना देण्यासाठी बनविण्यात आलेल्या चांदीच्या नाण्यात घोटाळा असल्याचा जाब साईबाबा संस्थानचे अध्यक्ष हावरे यांना विचारण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ जुन्या प्रसादलयाजवळील बैठक खोलीकडे दंडुके घेऊन चालले होते. या आंदोलनाची कुणकुण संस्थान मंडळाला लागली असल्याने त्यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. आंदोलनकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत संरक्षणभिंत जवळ येताच त्यांना पोलीस निरीक्षक अरविंद माने, संस्थानचे सुरक्षा विभाग प्रमुख पो.उप.अधिक्षक आनंद भोईटे यांनी आत जाण्यास मज्जाव केला. यावेळी ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.

अध्यक्ष हावरे यांच्याशी चर्चा करण्याची मागणी आंदोलनकांनी केली, मात्र यावेळी पोलीस व ग्रामस्थात वाद झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी संरक्षण भिंतीवरुन उडी मारुन आत प्रवेश करीत हावरे याचे वाहनच्या पुढील काच फोडून संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांनी गर्दी केली. त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा तसेच लाठीमार केल्याचा निषेध केला. सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलनकर्त्यांना शिर्डी पोलिसांनी पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवले होते. कायदेशीर कारवाई मात्र अदयाप झालेली नव्हती.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे की, शिर्डीत साईभक्तांसाठी कुठलीही सुविधासाठी, हॉस्पिटलमध्ये अद्ययावत मशिनरी, औषधे, तज्ञ डॉक्‍टर्स, लेझर शो, गार्डन, साईसृष्टी व विविध विकास कामांसाठी निधी न देता विदर्भासाठी 75 कोटीचा निधी दिला, आता शासनास दुष्काळ निवारण्यासाठी पन्नास कोटी देण्याचा निर्णय घेतला, केरळसाठी पाच कोटी रुपये दिले यास आमचा विरोध नाही, मात्र अगोदर शिर्डीच्या विकासकामांना प्राधान्य दया, ते कामे तातडीने सुरु करा. अशी मागणी आहे. याबाबत संस्थानकडून समर्पक उत्तर मिळत नसल्याने आता शिर्डी ग्रामस्थ व साई संस्थान असा वाद रंगणार आहे.

आंदोलनकर्त्यामध्ये नगराध्यक्ष कैलासबापू कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, विजयराव कोते, सुजित गोंदकर, सचिन कोते, राजेंद्र शिंदे, अशोक कोते, गोपीनाथ गोंदकर, साईराम गोंदकर, ताराचंद कोते, नितिन शेळके, प्रमोद गोंदकर, दिपक वारुळे, जमादार इनामदार, विकास कोते, सचिन चौगुले, समीर शेख, शफिक शेख, राहुल मगर आदी सहभागी झाले होते.
याबाबत घटनेचा शिर्डी शहर भाजपने निषेध नोंदविला आहे.

शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी म्हटले आहे की, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष हावरे यांच्या गाडीवर हल्ला झाला, मात्र हा हल्ला शिर्डी ग्रामस्थांनी केला असे भासवले जात आहे. मात्र आपला वैयक्तिक स्वार्थापोटी कॉंग्रेसच्या एका असंतुष्ट गटाने हा हल्ला केला आहे. शिर्डी ग्रामस्थ हे नेहमीच साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी या तत्वावर विश्वास ठेवतात त्यामुळे या हल्ल्‌यामागे शिर्डी ग्रामस्थ नाहीत. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, रविंद्र गोंदकर, साईराज कोते, सचिन शिंदे, रविंद्र कोते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)