शिर्डीत ‘जवाब दो’ आंदोलन

शिर्डी  – साईबाबा विश्‍वस्थानच्या साईनाथ रुग्णालयात भूलतज्ञ डॉक्‍टर उपलब्ध असतांना बाहेरचा भूलतज्ञ डॉक्‍टर कशासाठी बोलावता असा सवाल उपस्थित करीत, या भूलतज्ञांचे संस्थानच्या व रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी काही लागेबांधे आहे का? साईबाबांच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी याचा जाब विचारण्यासाठी शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे यांच्या कार्यालयात जवाब दो आंदोलन छेडण्यात आले.

साईनाथ रुग्णालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या कारणावरून शिर्डी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने बुधवारी दुपारी जवाब दो आंदोलन करून वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे यांना घेराव घालत जाब विचारण्यात आला.

“एमबीबीएस अधीक्षकाच्या हाताखाली एमडी डॉक्‍टरांना काम करावे लागते, हे कितपत योग्य आहे? यापूर्वी डॉ. आशा पेंडसे अधीक्षक असताना साईनाथ रुग्णालयाचा गौरव झाला होता, मात्र आज परिस्थिती बदलण्याचे काय कारण? या ठिकाणी जन्मलेल्या मुलांसाठी एनआयसीयु नाही, बालरोग तज्ञ नाही, आयसीयुमध्ये केवळ 8 बेड आहेत. बर्निग वार्ड नाही, साईनाथ रुग्णालय 80 टक्के कंत्राटी कर्मचाऱ्यांवर चालू असून, एवढ्या मोठ्या स्वरूपातील गरजा याठिकाणी असतांना साईबाबा संस्थान विदर्भात कोटींची उड्डाणे करीत आहे, ही शोकांतिका आहे. – निलेश कोते ( प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस )

यावेळी साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव निलेश कोते, जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते, तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, सुनील गोंदकर, शहराध्यक्ष दीपक गोंदकर, विकी चोरमुंगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

“साईनाथ रुग्णालयात तीन भूलतज्ञ असून आकृतिबंधानुसार चार भूल तज्ञांची गरज आहे. बऱ्याच दिवसांपासून तीन भूलतज्ञ आणि पाच शस्त्रक्रिया विभाग आहेत. यापूर्वी शस्त्रक्रिया पुढे ढकलले जात होते. ते होऊ नये यासाठी बाहेरून भूलतज्ञ बोलाविण्याची परवानगी घेतली आहे. हा एकट्या कोणाचा निर्णय नाही. बाहेरून येणाऱ्या भूलतज्ञांना कुठलाही पगार दिला जात नाही, त्यांना शासनदराने पैसे दिले जातात.
-डॉ. मैथिली पितांबरे – (वैद्यकीय अधीक्षक, साईनाथ रुग्णालय)

साईनाथ रुग्णालय मोफत केल्याचा मोठा गाजावाजा केला. मात्र येथे गोरगरीब रुग्णांना गोळ्या औषधे मिळतात, का असा सवाल कार्यकर्त्यांनी डॉ. पितांबरे यांना केला असता, त्यांनी प्रशासकीय अधिकारी अशोक औटी यांच्याकडे बोट दाखवून आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकली.

दरम्यान साईनाथ रुग्णालयातील मेडिकल विभाग आणि खासगी मेडिकल यांच्यातील सेटलमेंटला कोणाचा छुपा पाठींबा आहे? त्याचप्रमाणे रुग्णालयात उपचार मिळत नाही, पूर्ण वेळ एमडी दर्जाचा वैद्यकीय अधीक्षक नाही, परदेशातून अद्ययावत मशिनरी आणण्याच्या गप्पा मारणारे संस्थानचे अध्यक्ष हावरे यांनी प्रथम मशीन हाताळणारे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आहे का? हे तपासावे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)