मानवी मन समुद्राच्या लाटांप्रमाणे चंचल

महंत रामगिरी महाराज : गंगागिरी महाराज सप्ताहातील प्रवचनाचे तिसरे पुष्प

शिर्डी – मानवी मन हे समुद्राच्या लाटांप्रमाणे चंचल असते. त्याला तृष्णेने गाठले आहे म्हणून तो सतत असमाधानी असतो. आयुष्यात तृष्णारुपी लाटा येत असतात पण त्या वरवरच्या असतात त्यामुळे माणसाचे मन या लाटांप्रमाणे चंचल नसावे तर ते समुद्राच्या तळाप्रमाणे शांत असले, पहिजे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी प्रवचनाचे तिसरे पुष्प गुंफताना केले.

-Ads-

शनिवारी प्रवचन सोहळ्याला आ. डॉ. सुधीर तांबे, साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्‍वस्त भाऊसाहेब वाकचौरे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उद्योजक राहुलसिंग ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
भाविकांची सकाळपासूनच गर्दी होती. कालच गर्दीचा अंदाज आल्याने रात्री उशिरापर्यंत सप्ताह समितीच्या सर्व प्रमुखांची बैठक झाली. त्यात भोजन पंगत आणि स्वयंपाकगृहात येऊ शकणाऱ्या अडचणींची चर्चा होऊन अतिशय काटेकोर व सूक्ष्म नियोजन करण्यात आले.

गर्दीचा अंदाज घेऊन माजी महसूलमंत्री व संगमनेरचे आमदार यांच्याशी चर्चा करून आज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याकडून आमटीसाठी जास्तीचे दोन टॅंकर मागविण्यात आले. त्यामुळे आज सकाळी साडेनऊ वाजता शिर्डी सप्ताह समिती समितीचे पदाधिकारी वाढप यंत्रणा घेऊन सज्ज होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच विविध राज्यातून आलेल्या साईसेवकांमुळे सप्ताहाच्या श्रमदानाच्या कामाला मोठी मदत झाली.

शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत महाप्रसादाच्या पंगती सुरू होत्या. सकाळी दहापूर्वी महाप्रसादाच्या पंगती सुरू झाल्या. यावेळी आ. सुधीर तांबे, संगमनेरचे नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी महाप्रसाद तयार केला जातो, त्या स्वयंपाकगृहाला भेट देऊन तिथल्या सर्व यंत्रणांची पाहणी केली.

शिर्डीकरांच्या एकोप्याचे दर्शन…

येथे शिर्डीकरांच्या ऐकोप्याचे दर्शन पहायला मिळाले. गुरुवारच्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी दोन पंगती श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात वाढण्यात आल्या होत्या. मात्र शनिवारी सप्ताह समितीतील सदस्यांनी हे घरचे कार्य आहे, अशा भावनेने झोकून देऊन आपले योगदान दिले, याची उपस्थितांमध्ये चर्चा होती. सप्ताहस्थळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)