गंगागीर महाराज सप्ताह सांगतेला भक्तांचा महापूर

हरिनामाने दुमदुमली शिर्डी; साई संस्थानकडून 75 लाखांची देणगी

शिर्डी – शतके जाहली तरी प.पू. गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह सोहळा आज त्याच दिमाखात साजरा होत आहे. सप्ताहाची तीच परंपरा तशीच आहे. आज काळ बदलला, तरी काळाचा आत्मज्ञानावर काहीच प्रभाव पडत नसतो. त्याचा प्रभाव संसारावर होत असतो, असे मत सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी प.पू. गंगागिरी महाराजांच्या शिर्डीतील 171 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगीच्या काल्याच्या कीर्तनात व्यक्त केले.

या प्रसंगी व्यापीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, खा. सदाशिव लोखंडे, आ. बाळासाहेब थोरात, आ. स्नेहलता कोल्हे, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. प्रशांत बंब, बबनराव घोलप, बबनराव पाचपुते, रावसाहेब खेवरे, सुरेश चव्हाणके, साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, महंत रमेशगिरी महाराज, महंत काशिकानंदजी महाराज आदीसह सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रामगिरी महाराज म्हणाले, “गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवली असली, तरी विस्तार नारायणगिरी महाराजांनी केला. जोपर्यंत सृष्टी आहे, तोपर्यंत परमार्थ आहे. याचे फक्त चौकीदार व जमीनदार बदलत राहतात. संत हे मनाचे रक्षण करतात, तर आपण त्यांच्या तणाचे रक्षण करायचे असते. परमात्माकडे जाण्यासाठी आपल्यात असणारे रज, तम, सत्‌ गुण नाहीसे करावे लागतात. त्याबरोबर हृदयरुपी देहामध्ये अध्यात्म यायला हवे. ते आल्यानंतर मग जीव, ब्रम्ह, ऐक्‍य मिळवावे लागते. त्यांनतर परब्रम्हाची प्रचिती येते. अंतःकरणात जेव्हा भगवंत पाहण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण होते, तेव्हा भगवंत निश्‍चित दर्शन देतात.”

लाखो भाविकांचा मेळा गुरूवारी शिर्डीत काल्याचे कीर्तन ऐकण्यासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी दाखल झाला होता. यासाठी नियोजन समिती प्राथमिक सुविधा देण्यासाठी झटत होती. गरज पडेल त्या ठिकाणी नियोजन केले जात होते. अत्यंत धार्मिक वातावरणात हा सप्ताह पार पडत होता, तर कीर्तनाच्या वेळी भाविक मोठ्या उत्साहात फुगडी, टाळांचा ठेका धरताना दिसत होते. प.पू. गंगागिरी महाराज व साईबाबांच्या पादुका दर्शन मोठया भक्तिभावाने होत होते. शेतकरी बांधवांसाठी भरवलेल्या प्रदर्शनाचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. कमलाकार कोते यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)