एटीएम फोडून साडेसोळा लाख लांबविले

पोलिसांकडून चोरट्यांचा पाठलाग : अंधाराचा फायदा घेऊन चोरटे फरार

शेजारील एटीएमही फोडण्याचा प्रयत्न

दरम्यान चोरट्यांनी टाटा इंडिकॅश एटीएम शेजारी असणारे हॉटेल उंगली चाटमधील आयसीआयसीआय बॅंकेचे दुसरे एटीएम कटरच्या साहाय्याने कापले होते. परंतु पोलीस आल्याने या एटीएममधील 13 लाख रुपयांची रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही. अन्यथा चोरीचा आकडा वाढला असता.

शिर्डी – तालुक्‍यातील लोणी येथे लोणी-संगमनेर रस्त्याच्या कडेला असलेले एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 16 लाख 64 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही चोरीप्रवरा मेडिकल हॉस्पिटल समोर आज (दि. 28) पहाटे तीनच्या सुमारास घडली. गस्तीवरील पोलिसांनी चोरांना हटकल्याने सदर घटना समोर आली. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते पळून जाण्यात यशस्वी झाले.

लोणी-संगमनेर रस्त्यावरील प्रवरा ग्रामीण रुग्णालय समोर टाटा इंडिकॅशचे तीन एटीएम आहेत. यातील एक एटीएम सुमारे 5 ते 7 चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने कट केले. तत्पूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तोंड चोरट्यांनी वरील बाजूस केले. त्यानंतर एटीएम फोडून त्यातील सुमारे 16 लाख 64 हजार रुपये चोरले. याच वेळी लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह गस्तिपथक तेथून जात होते. एक इनोव्हा कार त्यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी गाडी माघारी फिरवली. पोलीस येत असल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी कारचा स्पीड वाढविला.

लोणी पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. चोरट्यांनी प्रथम बाभळेश्वर, कोल्हार मार्गे कार पळविली. परंतु नगर-मनमाड रस्त्यावरील तिसगाव फाट्यावरील हॉटेल ग्रीनजवळ चोरट्यांची गाडी बंद पडली. त्यामुळे चोरट्यांनी तिथेच असणाऱ्या शेतीचा आधार घेत पळ काढला. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, घटनास्थळी श्‍वानाला पाचारण करण्यात आले. त्याने राजुरीपर्यंत माग काढला. मात्र श्‍वान तेथेच घुटमळल्याने चोरटे वाहनातून पसार झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

चोरट्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कारमध्ये खाकी रंगाची जर्सी, गाडीमध्ये इनबिल्ट सायरन, एक गॅस कटर, दोन कटावण्या, गॅस सिलिंडर व ऑक्‍सिजन सिलिंडर अशा वस्तू लोणी पोलिसांनी जप्त केल्या. दरम्यान विखे कारखान्याच्या एका सुरक्षारक्षकाने सदरचे काही चोरटे पळून जाताना पहिले. त्यांनीही पोलिसांना त्वरित कल्पना दिली. मात्र पोलिसांनी पाठलाग करूनही चोरटे प्रवरानगर, लोहगाव व तिसगावमार्गे राजुरी रस्त्याने अंधाराचा फायदा घेत पसार झाले. चोरट्यांनी तोंडाला स्कार्फ बांधले होते.

मात्र एटीएम शेजारी असणाऱ्या विठ्ठल अण्णा शेट्टी यांच्या हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदरचे चोरटे जेरबंद झाले असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोणी पोलीस तपास करीत आहेत. तसेच टाटा इंडिकॅश या एटीएम जवळच आणखी 2 एटीएम होते. मात्र त्यातील रक्कम सुरक्षित होती.

लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, पो.ना. कुसाळकर, पो. हे. कॉ. अनारसे, पो. ना. सुरेश गागरे, पो. कॉ. खुळे आदींनी चोरट्यांचा पाठलाग केला. चोरट्यांनी एटीएम फोडूनच लाखोंची रक्कम लांबविल्याने लोणी पोलिसांपुढे या चोरीच्या तपासाचे मोठे आव्हान असणार आहे. सुमित मोरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून लोणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)