‘झिरो बजेट’ शेतीचा खर्च कमी, फायदा अधिक 

शिर्डी : येथील झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिरात बोलताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील. शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर, डॉ. सुरेश हावरे, रुबल अग्रवाल व इतर. (छाया : राजकुमार जाधव)

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील : शिर्डीत नैसर्गिक, विषमुक्‍त शेती प्रशिक्षण शिबीर

शिर्डी – शेतीच्या सर्वांगिण विकासासाठी नैसर्गिक शेती हा महत्त्वाचा पर्याय आहे. कृषी क्षेत्रातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या समस्या सोडविण्याबरोबरच शेतीतील वाढता खर्च कमी करण्यासाठी “झिरो बजेट’ (नैसर्गिक, विषमुक्‍त शेती) महत्त्वाचा पर्याय असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यातून शेतकऱ्यांना फायदाही चांगला मिळत असल्याचे पाटील म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “झिरो बजेट’ नैसर्गिक (अध्यात्मिक), विषमुक्‍त शेती’ या प्रशिक्षण शिबिरप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. या वेळी श्री साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, पद्यश्री सुभाष पाळेकर, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उप जिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री पाटील म्हणाले, शेती हा विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. आज शेतीला विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. या समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतीमधून जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील विविध ठिकाणी शेतकरी नाविण्यपूर्ण प्रयोग करत आहेत. ही देशाच्या व राज्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

कृषी विभागाच्या विविध योजनांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष घालावे, कृषी विभागाचा लौकिक वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना विविध प्रशिक्षण देण्यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील आहे. युवकांमध्ये शेतीबाबत आवड निर्माण होऊन, युवकांनी शेतीकडे वळणे गरजेचे आहे. आज शेतीमध्ये विविध रासायनिक खते व औषधांसाठी मोठा खर्च करून जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न व जमिनीचा पोत टिकविण्यासाठी नैसर्गिक शेती उत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)