बिनबुडाचे आरोप करण्याआधी आत्मपरीक्षण करावे

वाय. डी. कोल्हे : आमदार राजळेंवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर

शेवगाव – शहरटाकळी (ता. शेवगाव) ग्रामपंचायतीत सत्ता असताना ज्यांना विकासकामे करता न आल्याने जनतेने पराभवाची धूळ चारत ग्रामपंचायतीमध्ये सत्तेपासून दूर ठेवले अशांनी राजकीय स्वार्थासाठी लोकप्रतिनिधींवर बिनबुडाचे आरोप करण्याआधी आत्मपरीक्षण करावे आणि कर्तव्यदक्ष विकासाभिमुख लोकप्रतिनिधींवर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचे मत भाजप जिल्हा सरचिटणीस वाय. डी. कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

-Ads-

शेवगाव-पाथर्डीच्या लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे यांनी आजपर्यंत शेवगावच्या पश्‍चिम भागात अनेक भरीव विकासकामे केली आहेत. परिसरातील अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. त्यात प्रामुख्याने शहरटाकळी येथे दहा लाख रुपयांचा सभामंडप, देवटाकळी ते तागडवस्ती रस्ता डांबरीकरण, बक्‍तरपूर येथे सभामंडप, शहरटाकळी ते भावीनिमगाव रस्ता डांबरीकरण, देवटाकळी येथे शादिखाना, ढोरसडे अंत्रे येथे सभामंडप, पुनर्वसित गावाचा निधी, शहरटाकळी ते मठाचीवाडी रस्ता डांबरीकरण, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून परिसरातील गरजू लाभार्थ्यांना लाखो रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून दिले. बोंडअळीचा सर्वाधिक निधी शेवगाव-पाथर्डीला मिळवून दिला आहे.

शहरटाकळी व परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन टप्प्यातील रक्‍कम जमा झाली. तिसऱ्या टप्प्यातील निधी लवकरच खात्यावर जमा होणार आहे. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेतून बोगस लाभार्थी वगळून गरजू व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे वंचितांना न्याय मिळाला आहे.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाण्याचे गेल्या आठ दिवसापासून आवर्तन चालू असून टेलच्या भागात सद्यस्थितीत पाणी चालू आहे, असे कोल्हे यांनी म्हटले आहे. प्रसिद्धी पत्रकावर कोल्हे यांच्यासह रासपचे माजी तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर, मोहन महाराज खंडागळे, अशोक निंबाळकर, सुभाष बरबडे, रामप्पा गिरम, तात्याराव कावले, दादा मडके आदींच्या सह्या आहेत.

ही तर कार्यकर्त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरीच…

लोकप्रतिनिधींची विकासकामे नाहीत, असे बिनबुडाचे आरोप केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी सर्वांच्या लक्षात येत आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोणतीही ठोस विकासकामे होत नाहीत. “विकासकामे दाखवा अन्‌ बक्षीस मिळवा’, अशी वेळ आरोप करणाऱ्यांवर येऊ नये, अशी टीका कोल्हे यांनी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)