
शेवगाव – नगरपरिषदेने विविध प्रश्नासंदर्भात वेळोवेळी आश्वासने देवून त्याची पुर्तता न केल्याच्या निषेधार्थ आज कॉं. संजय नांगरे यांनी स्वत:ची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पैठण रस्त्यावरील स्मशानभूमीत उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाहीत व लेखी आश्वासने देवून त्याची पुर्तता न केलेल्या मुख्याधिकाऱ्यांना निलंबीत करत नाहीत तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
शेवगाव नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्याचा नियमीत पाणी पुरवठा करावा, शेवगाव शहरातील सर्व स्मशानभुमी व कब्रस्तान या ठिकाणी पिण्याचे पाणी, लाईट, कंपाऊंड व स्वच्छता करावी, शहरातील गटारांची स्वच्छता करावी, शहरातील घाणीचे साम्राज्य त्वरीत नष्ट करावे, डास प्रतिबंधनात्मक फवारणी करुन डेंगी, मलेरीया, चिकणगुण्या यासारखे आजार पसरणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात, वारंवार आंदोलनावर लेखी आश्वासने देऊन कर्तव्यात कसुर ठेवणाऱ्या व काम न कऱणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करावे, या मागणीसाठी आज कम्युनिष्ठ पक्षाचे संजय नांगरे यांची आंबेडकर चौकातून युवकांनी अंत्ययात्रा काढली.
ही अंत्ययात्रा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. नगरपरिषदेसमोर अंत्ययात्रा आल्यावर विरोधात घोषणाबाजी करुन सामान्य जनतेचे प्रश्न त्वरीत मार्गी लावावेत अशी मागणी केली. नंतर ही अंत्ययात्रा पैठण रस्त्यावरील स्मशानुमीत गेली. तेथे नागरे व क्रांती मगर या दोन युवकांनी उपोषणास सुरुवात केली.
अंत्ययात्रेत रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय बोरुडे, प्यारेलाल शेख, समीर शेख, अन्सार कुरेशी, सागर मगर, अजय मगर, प्रशांत मगर, प्रशांत इंगळे, संदीप मगर, राहुल भालेराव, भाऊराव तिजोरे, विशाल इंगळे यांच्यासह युवक व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा