स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ‘गेटबंद’ आंदोलनाचा इशारा

शेवगाव – कोल्हापूर भागातील साखर कारखान्यांसारखा एफआरपी व्यतिरिक्त दोनशे रुपये अधिकचा भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि परिसरातील साखर कारखान्याचे प्रतिनिधींची तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी आज तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या समन्वय बैठकीकडे ज्ञानेश्वर व वृद्धेश्वर या दोन साखर कारखान्यांनी पाठ फिरवली तर गंगामाई व केदारेश्वर कारखान्यांनी सकारात्मक भूमिका न घेतल्याने बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे साखर कारखान्यांनी दोन दिवसात ऊस दराची कोंडी फोडली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 19 तारखेपासून गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी संघटना आणी कारखाने यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठी शुक्रवारी समन्वय बैठक आयोजीत केली होती. बैठकीस तहसीलदार विनोद भामरे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, संघटनेचे पदाधिकारी संतोष गायकवाड, दत्तात्रय फुंदे, दादा पाचारणे, प्रविण म्हस्के, भिमराज भडके, चंद्रकांत पाखरे, संदिप मोटकर, गंगामाई कारखान्याचे ऊसविकास अधिकारी व्हि.आर. शिंदे, केदारेश्वरचे प्रतिनिधी शरद सोनवणे, नायब तहसिलदार मयुर बेरड, पुरवठा अधिकारी नितीन बनसोडे, गुप्तचर विभाग पोलीस राजु चव्हाण आदी उपस्थीत होते. या बैठकीस ज्ञानेश्वर व वृध्देश्वर कारखान्याचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने या कारखान्यास नोटीस बजाविण्याची मागणी करण्यात आली.

-Ads-

बैठकीत एफआरपी रक्कम 2 हजार 915 मधुन तोडणी खर्च 631 रुपये 90 पैसे वजा जाता निव्वळ देय 2 हजार 283 रुपये 10 पैसे याप्रमाणे येत असुन शासन नियमानुसार एफआरपी प्रमाणे ऊसदर अदा करण्याचा तसेच शासन ऊसदर नियंत्रण मंडळाने निश्‍चित केलेल्या दराप्रमाणे जी रक्कम देय बाकी असेल ती उत्पादकांना अदा करण्याचा निर्णय गंगामाई कारखान्याच्या प्रतिनिधीने जाहीर केला. तर केदारेश्वर कारखान्याच्या प्रतिनिधीने एफआरपी उताऱ्याप्रमाणे व शासनाच्या धोरणानुसार देण्याचे आश्वासन देऊन दराची कोंडी कायम ठेवली.

“साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. कमीत कमी कायदेशीर एफआरपी जाहीर करावी म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्या कारखान्यास ऊस द्यावा याचा निर्णय घेता येईल.
-दत्ता फुंदे. अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेवगाव.

शासनाच्या धोरणानुसार कारखाना गळीत सुरु झाल्यापासुन 14 दिवसात भाव जाहीर करणे बंधनकारक असताना या भागातील कारखान्याने अद्याप भाव जाहीर केले नसल्याने शासकीय निर्णयाची पायमल्ली होत असेल तर कारखान्यावर गुन्हे दाखल करावेत, कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे एफआरपी व्यक्तिरीक्त 200 रुपये शेतकऱ्यांना द्यावेत तसेच पाण्याअभावी जळू लागलेल्या आणि हुमणीचा प्रादुर्भाव झालेल्या ऊसतोडीला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी करुन केदारेश्वर कारखान्याचा ऊसदर मान्य नसल्याची भुमिका स्पष्ठ केली.

त्यावर शेवटी दोन दिवसात केदारेश्वर, वृध्देश्वर, ज्ञानेश्वर कारखान्यांनी ऊसदराची कोंडी फोडली नाहीतर सोमवार (दि.19) पासुन या कारखान्यांसमोर गेटबंद आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे जाहीर केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)