सुस्त सरकारला जागे करण्यासाठी ‘एल्गार मोर्चा’

चंद्रशेखर घुले : 31 पर्यंत दखल न घेतल्या तालुक्‍यात सर्वत्र ‘रास्ता- रोको’

कंदील घेवून शेतकरी सहभागी

मोर्चात भारनियमनच्या निषेधार्थ काही मोर्चेकरांनी हातात कंदील घेतले होते. तर म्हसणजोगे व धनगराच्या वेशभुषेतील सहभागी झालेले लोक लक्ष वेधून घेत होते.

शेवगाव – यंदा खरीप व रब्बीही हातचे गेले. पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दुर भटकंतीची वेळ आली, जनावरांना चारा नाही, हाताला काम नाही अशा भीषण दुष्काळात जनता होरपळत असताना सरकार सुस्त आहे. त्याला जागे करण्यासाठी हा एल्गार मोर्चा आहे. त्याची दखल न घेतल्यास 31 तारखेला संपूर्ण तालुक्‍यात “रास्ता- रोको’ करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा, शेवगाव पाथर्डी तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करावे, छावण्यांना मंजुरी द्यावी, मुळा धरणाचे किमान दोन आवर्तने टेल टू हेड स्वरूपात द्यावीत, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची वीज बिलेमाफ करून बंद पडलेल्या योजना सुरू कराव्यात, टॅंकरची मागणी येईल तेथे टॅंकर सुरू करावा, त्याचे अधिकार तहसीलदाराकडे द्यावेत, ताजनापूर टप्पा क्रमांक दोनचे काम त्वरित सुरू करावे आदी प्रमुख मागण्यासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर शहरातील क्रांती चौकातून सकाळी 12 वाजता एल्गार मोर्चा नेला.

मोर्चातून प्रचार

बहुतेक वक्‍त्यांनी संघटीत व्हा, आपला हक्‍काचा लोकप्रतिनिधी हवा, असे आवाहन करण्यात आल्याने मोर्चातून प्रचार झाला.

हा मोर्चा आंबेडकर चौक मार्ग तहसील कार्यालयावर नेण्यात आला. त्यासाठी तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यातून, थेट विजयपूरपासून लोक सकाळीच येथे आले होते. या आंदोलनामध्ये माजी आमदार नरेंद्र घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, नगरसेवक सागर फडके, गंगा पायघन, ताहेर पटेल, बप्पासाहेब पारनेरे, अंबादास कळमकर, बबन भुसारी, इमरान शेख, समीर शेख, नंदू मुंढे, संतोष जाधव, अजय नजन, संदीप बडे आदींसह पदाधिकारी, शेतकरी , युवक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

घुले म्हणाले, जनतेचा आक्रोश उत्स्फूर्त आहे.झोपी गेलेल्याला जागे करता येते, मात्र या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यासाठी त्याला आरी टोचूनच जागे करावे लागेल. टंचाई बैठकीचा नुसता फार्स झाला. त्यांना सर्वसामान्याचे देणेघेणे नाही. जायकवाडीच्या निर्मितीमध्ये आपल्या हक्काचे साडेतीन टीएमसी पाणी राखीव असताना आपणास आज पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे. आमदार असताना दुष्काळात गाव तेथे छावणी सुरू केली. शेतकऱ्यांना चारशे कोटीच्या कर्जमाफीचा लाभ देवून दिलासा दिला होता. आता मात्र दुष्काळ सदृश म्हणून तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे हे घडले आहे.

नगरपालिकेत आता फक्त वाटाघाटी चालू आहेत. घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी साठ लाखाची निविदा काढली. त्यावेळी त्या मंडळींनी विरोध केला होता. आज तीच मंडळी त्यासाठी एक कोटी 20 लाखाची निविदा काढत आहेत. हा घाटा नव्हे वाटा आहे. अशी टीका करुन थकीत वीज बिलासाठी बंद पडलेल्या शहरटाकळी व 24 गावे तसेच हातगाव व 28 गावाच्या प्रादेशिक नळ योजना ही बिले माफ करून त्वरित सुरू कराव्यात, आदि मागण्या त्वरित मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

दिलीपराव लांडे यांनी भाषणापूर्वी 1914 च्या निवडणूकीच्या काळात नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्‍वासन देवून “ये मेरा वादा रहा’ असे ठासून सांगितल्याची मोबाईल मधील क्‍लीप ऐकवून चार वर्ष झाली. झाली कां कर्जमाफी असा प्रश्‍न केला. तेव्हां सर्वांनी एकच आवाज केला. त्यांची कर्जमाफी फसवी आहे.आज पाऊस नाही पेरणीच नाही, अशी भयावह स्थिती आहे. दोन कोटीना नोकऱ्या देणार होते. आरक्षणाच आश्वासनही फोल ठरले. सरकारचा प्रशासनावर वचक नाही. आता झेंडे घेवून आलो. पुढच्या वेळी रुम्हणे घेऊन येऊ असे ते म्हणाले.

यावेळी कैलास नेमाणे, मन्सूर फारुकी, संजय फडके, कॉं.संजय नागरे, राजेंद्र दौंड, भाऊराव भोंगळे, पंडितराव भोसले, गहिनीनाथ कातकडे, रामनाथ राजपुरे, काकासाहेब नरवडे, मंगेश थोरात, सभापती डॉ.घुले आदींची भाषणे झाली. यावेळी मागणीचे निवेदन तहसिलदार विनोद भामरे यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)