स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रादेशिक साखर संचालकांना निवेदन

नगर -शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यातील चार कारखान्यांनी शेतकऱ्यांना अडीच हजार रुपयांप्रमाणे भाव दिला; परंतु त्यानंतर अंतिम भाव जाहीर केलेला नाही. उसाला लवकर अंतिम भाव दिला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेवगाव तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी आज नगर येथे येऊन प्रादेशिक साखर संचालकांना निवेदन दिले. त्यात शेवगाव तालुक्‍याच्या आसपास चार कारखाने आहेत. त्यांनी तीस लाख टन उसाचे गाळप केले. ज्ञानेश्‍वर, वृद्धेश्‍वर, केदारेश्‍वर व गंगामाई या कारखान्यांनी शेवगाव तालुक्‍यातील ऊस नेला.

तीन कारखान्यांनी अडीच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले, तर एका कारखान्याने 2550 रुपये वर्ग केले. त्यानंतर आणखी रक्कम जमा करण्याचे आश्‍वासन कारखान्यांनी दिले होते; परंतु हे आश्‍वासन कारखान्यांनी पाळले नाही. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्‍यात सभासदांची जागरुकता मोहीम हाती घेतली आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे जमा केले नाही, तर चारही कारखान्यांविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या नेत्यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, शहराध्यक्ष काकासाहेब तेलोरे, शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे, संजय केदारे आदींनी नंतर जिल्हा विपणन अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले. शेवगाव बाजार समितीत मूग व उडदाची आवक सुरू झाली आहे; परंतु तेथे या दोन्ही शेतमालांना योग्य भाव मिळत नाही.

मुगाला सहा हजार नऊशे रुपये हमीभाव असताना व्यापारी तीन ते चार हजार रुपये दराने खरेदी करीत आहेत. सरकारी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा उपनिबंधकांनाही या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)