दुष्काळाच्या सावटाखाली पोळा साजरा

शेवगाव : येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयासमोर पोळ्यानिमित्त सजवलेल्या बैलांसह जमलेले शेतकरी व ग्रामस्थ. (छाया : भागवत बागडे)

शेवगाव शहरासह तालुक्‍यातील चित्र : मिरवणुकीतही पंचेचाळीसच जनावरे

शेवगाव – शहरासह परिसराला श्रावणी पोळ्याची ऐतिहासिक परंपरा आहे. येथे 1912 पासून सार्वजनिक पोळा भरतो. पोळ्याची धामधूम महिनाभर अगोदर सुरू होते. मात्र या परिसराकडे पर्जन्यराजाने लागोपाठ तीन-चार वर्षांपासून पाठ फिरवल्याने येथे पोळ्याचा नेहमीचा उत्साह नव्हता. जेथे हजारोवर बैलजोड्या, शेकडो खिलारी, गावरान गायी सजवून येत, असे तेथे या वेळी अवघी 45 जनावरे होती.

दुष्काळाचे सावट असतानाही आज पोळ्याच्या दिवशी काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजांची सजावट करण्यात शेतकऱ्यांनी कसर ठेवली नाही. दरवर्षी हजारो बैलजोड्यांनी पोळा साजरा व्हायचा. यंदा मात्र तो उत्साह नव्हता. यंदा हंगामाच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर तीन महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. असे असतानाही उसनवारी करून वर्षभर साथ देणाऱ्या बळीराजासाठी लागणारे गोंडे, हिंगूळ, घुंगरमाळा, रंग, फुगे, बेगड, झुली आदी साहित्य खरेदी केले. सणासाठी पुरणपोळीचा नैवेद्य करुन तो बैलांना भरवला. घरच्या महिलांनी बैलांचे पूजन केले.

काळ्या आईची नारळ वाढवून नैवेद्य ठेवून मनोभावे पूजा करीत पोळा सण साजरा केला. शहरातील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयासमोरील पोळा मैदानावर सर्व बैल, गायी व घोड्यांना सजवून रांगेत उभे केले होते. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करण्यात आली. पशु मालक शेतकऱ्यांचा नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी गौरव केला. या वेळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, विनोद मोहिते, नगरसेवक कमलेश गांधी, नितीन दहिवाळकर, शब्बीर शेख, राहुल बंब, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हरिश्‍चंद्र गवळी, डॉ. बाजीराव अटक, डॉ. मनोहर लाड, डॉ. लक्ष्मण नाईक, डॉ. भाऊसाहेब भोसले यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. संजय नांगरे यांनी सूत्रसंचालन केले. कैलास तिजोर यांनी आभार मानले.

शेवगाव तालुक्‍यामध्ये अमरापूर, ढोरजळगाव, आव्हाणे, आखेगाव, सामनगाव, बोधेगाव, चापडगाव उत्साहात साजरा झाला. पावसाचा अंदाज चुकल्याने येथील व्यावसायिकांनाही फटका बसला. येथील बाजारपेठेत पोळ्याला लाखांनी नारळाची आवक होते. संपूर्ण बाजारपेठेत रस्त्यावर नारळाच्या पोत्याच्या थप्प्या लागत. मात्र या वेळी मोठ्या दुकानातही त्या थप्प्या आढळल्या नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)