कर्जमाफीपासून नगर जिल्ह्यातील 80 हजार शेतकरी वंचित

File photo

व्यक्तिनिहाय कर्ज लाभार्थींची यादीच अधिकाऱ्यांकडे नसल्याने बैठक गुंडाळली

सरकारला बदमान करण्याचा कट

आमदार शिवाजी कर्डिले यांनी या महत्त्वपूर्ण विषयावर उत्तर देण्यासाठी अधिकारी समर्थ नाहीत याकडे लक्ष वेधत या अधिकाऱ्यांनी सरकारची बदनामी चालवली असल्याचे म्हटले. जिल्हा उपनिबंधकांकडे माहिती नाही. अग्रणी बॅंकेचे अधिकारी म्हणतात योजनेशी संबंध नाही. जिल्हा बॅंकेचे मॅनेजरांनी बैठकीकडे पाठ फिरवली आहे. सरकार व्यक्तीनिहाय कर्जमाफीचे धोरण घेते. त्याची अंमलबजावणीची जबाबदारी प्रशासनावर असते. याचे गांभीर्य सरकारी अधिकाऱ्यांना नाही. ही गंभीर बाब आहे. सरकारला बदनाम करण्याचा कट या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. जिल्हाधिकारी साहेब, याकडे लक्ष द्या, असेही शिवाजी कर्डिले सांगितले.

नगर – छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफीत जिल्ह्यातील सुमारे 80 हजार शेतकरी वंचित असल्याची माहिती कर्जमाफीच्या आढावा बैठकीत समोर आली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना व्यक्तीनिहाय कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी किती लाभार्थी आहेत याची माहिती विचारल्यावर जिल्हा उपनिबंधक, जिल्हा सहकारी आणि अग्रणी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती देता आली नाही. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. तीन दिवसांनंतर ही बैठक होईल, असे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

-Ads-

जिल्हा उपनिबंधक यांनी जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 55हजार 825 शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे 917.94 कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. जिल्ह्याला सरकारला दहा ग्रीन याद्या प्राप्त झाल्या असून, त्यातील नऊ ग्रीन याद्यांतील लाभार्थ्यांनी कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. दहाव्या ग्रीन यादीवर काम सुरू आहे. आमदार विजय औटी यांनी यावर राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाकडे बैठकीतील लक्ष वेधत अधिकाऱ्यांचे पुरते “पोस्टमोर्टम’ केले.

औटी यांनी राज्य सरकारने व्यक्तीनिहाय कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यातील व्यक्तीनिहाय कर्जमाफीचे आलेले अर्ज, त्याचा लाभ घेतलेले शेतकरी, लाभाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती विचारली. त्यावर जिल्हा उपनिंबधकांना काहीच उत्तर देता आले नाही.

व्यक्तीनिहाय कर्जवाटपाची माहिती नसल्याची कबुली देत त्यांनी महाऑनलाईन यंत्रणेकडे बोट दाखविले.महाऑनलाईनकडे माहिती विचारल्यावर 23 हजार व्यक्ती असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. जिल्हा बॅंकेकडे याची माहिती असेल, असा कयास बांधण्यात आला. त्यावर जिल्हा बॅंकेचे अधिकाऱ्यांनी उत्तरे देण्यासाठी उभे राहिले. बैठकीला मॅनेजर नसल्याचे समोर आले. आमदार शिवाजी कर्डिले आणि औटी यांनी मॅनेजर कोठे आहे, याची विचारणा केल्यावर ते मुंबईला काल बैठकीला होता. त्यामुळे ते येऊ शकले नाही.

अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापकांना देखील याची उत्तरे देता आले नाही. त्यांनी तर या योजनेशी आपला कोणताच संबंध नसल्याचे सांगितले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यावर खूपच चिडले. मग तुम्ही बैठकीला आलातच कसे? अशी विचारणा केली. जनतेच्या प्रश्‍नांवर काम करता येत नसेल, तर काम कशाला करता, असेही शिंदे यांनी त्यांना सुनावले. जिल्हा उपनिबंधक यांनी यावर तीन दिवसात यादी करून आपण बैठक घेऊ, असे सांगितले. पालकमंत्री शिंदे यांनी त्यानुसार सूचना देत बैठक संपल्याचे सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)