मंजुषा गुंड यांच्या खड्ड्यांच्या सेल्फीतून पालकमंत्री टार्गेट

नगर-सोलापूर रस्त्याची दुरवस्था मांडण्याचा प्रयत्न 

नेटीझन्सच्या शब्दात प्रतिक्रिया..

पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या विरोधात हळूहळू रान पेटविण्यासाठी मंजूषा गुंड पुढे येत आहेत. त्यांनी टाकलेल्या सोशल मीडियावरील पोस्टवर नेटीझन्सने शेलक्‍या शब्दात प्रतिक्रिया दिल्या. कर्जत तालुक्‍यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांसाठी हा प्रश्‍न जिव्हाळ्याचा बनला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांनी प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे याच प्रश्‍नाकडे गुंड यांनी लक्ष वेधले आहे.

कर्जत – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांनी नगर-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांत बसून सेल्फी काढला. गुंड यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघातील रस्त्याची दुरावस्था झाल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याची सोशल मीडियातून पोस्ट टाकली.

पालकमंत्र्यांकडून या प्रश्‍नावर दुर्लक्ष होत असल्याचे नेटीझन्सने विचार मांडत त्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. गुंड यांनी खड्ड्यांच्या मुद्यावर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना टार्गेट केले आहे.

मंजूषा गुंड यांची ओळख ही संयमी राजकारणी म्हणून आहे. कोणावर टीका करणे, दोष देणे असे त्यांच्या सार्वजनिक जीवनात सहसा दिसत नाही. मात्र 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुंड या आक्रमक होऊ लागल्या आहेत. जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती येताच त्यांनी पक्षाच्या बांधणीसाठी विविध कार्यक्रम उपक्रम घेतले. वेळोवेळी भाजपला कोंडीत पकडण्याची संधी त्यांनी सोडली नाही. नगर, कर्जत, इतर भागात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांचा जनसंपर्क प्रचंड वाढला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी गुंड कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपताच त्यांची पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत गुंड हे उमेदवारीचे दावेदार आहेत. या पार्श्‍वभूमीवर मंजूषा गुंड यांच्या सेल्फीला विशेष महत्त्व आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)