संगमनेर शहर शिवसेनांतर्गत वाद आला चव्हाट्यावर 

जिल्हाप्रमुख व शहरप्रमुखांची पक्षातून हकालपट्टीची मागणी थेट शिवसेना प्रमुखांकडे

संगमनेर  – संगमनेरात शिवसेनातंर्गत वाद उफाळून आला आहे. शिवसेना शहरप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांनी माजी तालुकाध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी केल्याने यासंदर्भात माजी तालुकाप्रमुखांनी थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करत या दोघांचीच पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुखांसह स्थानिक शिवसेनांतर्गत पत्रकबाजीमुळे चांगलीच अडचणीत सापडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरुन माजी तालुकाप्रमुख, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांची शिवसेनेतून कायमस्वरुपी हकालपट्टी केल्याचे पत्रक शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या सहीने माध्यमांकडे पाठविण्यात आले आहे. या पत्रावरुन पक्षातंर्गत चांगलाच गदारोळ निर्माण झाला असतांनाच वाकचौरे यांनी देखील दुसरे पत्रक काढत संबधितांची तक्रार थेट “मातोश्री’कडे केली आहे.

माजी समाजकल्याण मंत्री बबन घोलप यांनी संगमनेरमध्ये येत शिर्डीतून खासदारकीची निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्या आता येथील पदाधिकाऱ्यांचा वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनांतर्गत अनेक गट निर्माण झाले असून ही गटबाजी मोडून काढण्याचे आव्हान पक्ष श्रेष्ठींसमोर निर्माण झाले आहे.

अंतर्गत या गटबाजीचे पडसाद अधूनमधून नेहमीच येथे उमटत असतात. मात्र याकडे फारसे गांभीर्याने कोणी बघत नाही. आता मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच उफाळून आलेल्या या गटबाजीमुळे शिवसेना वादात सापडली नाही. सेनेतील या गटबाजीचा फटका विद्यमान पदाधिकाऱ्यांसोबत शिवसैनिकांना देखील बसत असल्याने शिवसेना गटातटात विभागली गेली आहे.

प्रत्येकजण आपल्यामागे मोठे जनमत असल्याचे वरिष्ठांना दाखविण्याचा प्रयत्न करत असले तरी स्थानिक निवडणुकात मात्र पक्षाला मिळणारे अपयश या सर्वच पदाधिकाऱ्यांचा खरा “आरसा’ दाखविणारे ठरले आहे. यातथन कोणी बोध घ्यायला तयार नाही. सोशल मिडीया, फेसबुक, व्हॉटसअप्‌ ग्रुपच्या माध्यमातुन एकमेकांवर शाब्दीक बाण मारण्यात सर्वच पुढे आहेत.

त्यातच सोशल मिडियाची जागा आता आप-आपसातील पत्रकबाजीने घेतल्याने थेट एकमेकांची हकालपट्टी करण्याची भाषा सुरु झाली आहे. स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या या वादात आता जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंनीदेखील उडी घेतल्याचे कतारी यांनी काढलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते.

“शिवसेनेतून एखाद्याची हकालपट्टी करण्याचा अधिकार केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता. त्यानंतर तो अधिकार शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे.केवळ एखाद्याच्या फोनवरुन कुणाची पक्षातून हकालपट्टी करता येत नाही. माझी हकालपट्टी करण्याचा अधिकारच या पदाधिकाऱ्यांना नसल्याचे स्पष्ट करत पक्षशिस्त मोडून पदाचा गैरवापर करणाऱ्या जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व शहरप्रमुख अमर कतारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी ठाकरे यांच्याकडे केली आहे. बसस्थानकाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची आपली मागणी होती. मात्र हे दोन्ही पदाधिकारी स्थानिक सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी असे करत आहेत.
– कैलास वाकचौरे, माजी तालुकाप्रमुख.


“शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशाने माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्ष विरोधी काम करणे,पक्षाचे कोणतेही पद नसतांना खोटे लेटरपॅड तयार करुन महावितरणच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी दोनदा पत्रव्यवहार केला. व्हॉटसअप्‌, सोशल मिडियाच्या माध्यमातून शिवसेना विरोधी काम करत पक्षाची शिस्त भंग करणे आदी काही कारणांमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांचा पक्षाशी आता कोणताही संबंध नाही.
– अमर कतारी, शहरप्रमुख.


 

“पक्षांतर्गत स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वाद मी स्वत: आज मिटविला. चुका दोघांकडूनही झाल्या. त्यामुळे गैरसमजातुन वाद निर्माण झाला तो आमचा अंतर्गत विषय आहे. यासंदर्भात जो काही निर्णय असेल तो वरिष्ठ घेतील. कोणाला शिवसेनेतून काढण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. ते अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहेत. यासंदर्भात शहर प्रमुख अमर कतारी यांना पुन्हा नव्याने पत्रक काढून माध्यमांना देण्याबाबत सांगितले आहे.
– रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख.


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)