कृषी स्वावलंबन योजनेसाठी जिल्ह्यातून 1 हजार 68 प्रस्ताव

संगमनेर तालुक्‍यातून अवघे 76 प्रस्ताव

संगमनेर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने 8 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी 1 सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात 1 हजार 68 तर संगमनेर तालुक्‍यात 76 प्रस्ताव दाखल केले आहेत. 9 सप्टेंबरपर्यंत हे प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना उपलब्ध झालेल्या शेतीमध्ये शाश्‍वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन त्याचे उत्पन्न वाढावे व त्याचे जीवनमान उंचवावे, यासाठी राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अमलात आणली. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन विहिर खोदण्यासाठी 2 लाख 50 हजार रुपये, पंपसंचासाठी 20 हजार रुपये, वीजजोडणी 10 हजारा, सूक्ष्म सिंचन ठिबकसाठी 50 हजार व तुषार संचासाठी 25 हजारांचे अनुदान देण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा विकास कृषी कार्यालयाच्या वतीने या योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेंतर्गत 10 ऑगस्टपासून जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यामध्ये लाभार्थी शेतकरी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा, त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे, त्याचबरोबर सातबारा व होल्डिंग, त्याचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपयापर्यंत असावे, नवीन विहिर घेण्यासाठी लाभार्थीकडे कमीत कमी 40 गुंठे जमीन असणे आवश्‍यक आहे.

या योजनेंतर्गत 1 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 68 तर संगमनेर तालुक्‍यातील 76 शेतकऱ्यांनी नवीन विहिर पंपसंच कृषी पंपाला वीजपुरवठा जोडणी सूक्ष्म सिंचनासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत. उदिष्टापेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेत प्रस्ताव सादर करण्यासाठी 9 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेच्या मुदतीत जास्तीत जास्त संख्येने प्रस्ताव दाखल करावे असे आवाहन पंचायत समिती कृषी विभागाकडून केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)