दूध उत्पादकांचे अनुदान तडकाफडकी बंद

File Photo

शासनाकडून अनुदानाबाबत लेखी आदेश न आल्याने संघांनी घेतला निर्णय

संगमेनर : दूध उत्पादकांना प्रतिलिटर 25 रुपये दर मिळाला पाहिजे, यासाठी सरकारची 1 ऑगस्टला सुरू केलेली भुकटी अनुदानाची पथदर्शी योजना 31 ऑक्‍टोबरला तीन महिने पूर्ण झाल्याने संपली आहे. सरकारकडून या योजनेस आणखी तीन महिने मुदतवाढ दिल्याचे तोंडी सांगितले. मात्र दुग्धविकास खात्यास कोणतेही लेखी आदेश न आल्याने या विभागाने दूध उत्पादकांना देण्यात येणारे 5 रुपये लिटरचे अनुदान तडकाफडकी बंद केले आहे. अनुदानाबाबत शासनाकडून लेखी आदेश आले नाही. तसे परिपत्रक काढून दूध संघांनी दूध संकलन केंद्रांना कळविले आहे. शासनाकडून पुढील आदेशापर्यंत अनुदान स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यातील भुकटी उत्पादनासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदानाची योजना 31 ऑक्‍टोंबर रोजी तीन महिने पूर्ण झाल्याने संपली. 1 ऑगस्टपासून ही योजना सुरू झाली होती. सुरुवातीच्या अडीच महिन्यापर्यंत या योजनेतील अनुदानच विलंबाने मिळत गेल्याने दूध उत्पादकांचे दुधाचे पैसेही रखडले. त्याचवेळी या योजनेचे भवितव्य दूध उत्पादकांना कळाले होते. मात्र दूध उत्पादनातील तिढा काही संपत नसल्याने व तीन महिन्यात परिस्थिती सुधारेल, या सरकारच्या भरवशावर ही योजना सुरू होती.

शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आम्हाला अद्यापही दीड महिन्याचा अनुदान येणे बाकी आहे. एक तारखेपासून अनुदानाबाबत लेखी आदेश न निघाल्याने पुढील आदेशापर्यंत 5 पाच रुपये अनुदान स्थगित करण्यात आल्याचे दूध संकलन केंद्र चालक व बल्ककुलर चालक यांना परिपत्रक काढून कळवले आहे.
-आबासाहेब थोरात, अध्यक्ष एस. आर. थोरात, संगमनेर

आता ही योजना संपल्याने व या योजनेतील अनुदानाचे लाखो रुपये येणे बाकी असल्याने संगमनेर येथील खाजगी एस. आर. थोरात दूध संघाकडून शनिवार दि. 9 नोव्हेंबर रोजी सर्व दूध संकलन केंद्र चालक व बल्ककुलर चालक यांना परिपत्रक काढून 1 नोव्हेंबरपासून शासनाकडून अनुदानाचे लेखी आदेश न निघाल्याने प्रतिलिटर 5 रुपये अनुदान शासनाकडून पुढील अध्यादेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे कळवण्यात आले आहे.

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मागील आठवड्यात ही योजना आणखी तीन महिने सुरू ठेवणार असल्याची घोषणा एका जाहीर कार्यक्रमात केली होती. त्यावेळी ही योजना पुढे सुरू राहील, या आशेवर दूध उत्पादक होते. मात्र सरकारमधील मंत्र्यांची फक्‍त भाषणेच झाली. कारण दुग्धव्यवसाय खात्याकडून यासंदर्भात लेखी नसल्याने आम्ही कोणते आदेश देऊ शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारने 15 जुलै रोजी दुधाच्या भुकटी उत्पादनासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान जाहीर केले. ही योजना प्रत्यक्षात लागू होण्यास 1 ऑगस्ट लागला. तेव्हापासून या योजनेला लागलेला अपशकुन काही संपत नाही. सुरुवातीला 1 ते 10 ऑगस्ट एवढेच अनुदान सरकारने दूध उत्पादकांना दिले. त्या भरोशावर दुसरा पगार दूध संघांनी केला. मात्र पुढे तेच अडचणीत सापडले.

शासनाने पाच रुपये अनुदान बंद केले तर माझा गोठ्यातील गाईंच्या दुधाला केवळ 17 रुपये दर मिळेल. आम्ही व्यवसाय कसा करायचा अगोदर दुष्काळाची स्थिती आहे. आताच माणसांच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट बनलाय, जनावरांना संभाळायचा खर्च वाढणार आहे. परिस्थिती आणखी हालाखीची होईल.
– मिलिंद थोरात, दुध उत्पादक शेतकरी.

सरकारने योजना संपत आली तरी अद्यापही काही दूध संघाचे अर्धे अनुदान दिले नाही. अनुदान वेळेत मिळत नसल्याने सरकारने आता योजनेला मुदतवाढ दिली तरी दूध प्रकल्पांकडून त्याला कितपत सहकार्य मिळेल ही देखील शंका आहे. दूध प्रकल्प अडचणीत असताना केवळ सरकार म्हणते म्हणून पगार करायचे याबाबत ते विचार करू लागले आहेत. मात्र यात कोंडी दूध उत्पादकांची होऊ लागली आहे.

दरम्यान, जर योजना पुढे सुरू ठेवली नाही तर खाजगी दूध संघाकडून आज सरासरी 22 रुपये प्रतिलिटर दुध दर मिळालेल्या दूध उत्पादकास केवळ 17 रुपये मिळणार आहेत. त्यातच जोडीला दुष्काळ दाटून आलेले आहे. अशा स्थितीत दूध उत्पादकांना हिरवा, वाळलेला चारा भडकलेल्या किमतीत खरेदी करावा लागतोय. पाण्याची टंचाई असल्याने त्याचा सरळ परिणाम दूध उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे जर सरकारने ही योजना सुरू ठेवली नाही तर दूध उत्पादकांना जनावरे बाजारात आणावी लागतील अशी चिन्हे आताच दिसू लागली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)