मज्जाव केल्यानंतर तहसीलदारांनी ट्रॅक्‍टर घेतला ताब्यात

संगमनेर  – मुळा नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा करणारा ट्रॅक्‍टर महसूल पथकाने पकडला. पकडलेला ट्रॅक्‍टर कारवाईसाठी संगमनेरला नेऊ नये, यासाठी संबंधितांकडून महसूलच्या पथकाला मज्जाव करण्यात आला. मात्र याची माहिती तहसिलदारांना मिळताच त्यांनी पोलिस निरीक्षकांसोबत घटनास्थळी येत ट्रॅक्‍टर ताब्यात घेत संगमनेरला आणला. संबंधित ट्रॅक्‍टर हा शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा असल्याची चर्चा होती. महसूलने पंचनामा केला असून, संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी सांगितले.

प्रवरा, मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी थेट महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप करत त्यांचेच तस्करांना अभय असल्याचे सांगितले होते. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महसूलच्या पथकाने मंगळवारी (दि. 27) सायंकाळी केलेल्या कारवाईत शिवसेनेचाच पदाधिकारी सापडल्याने त्याची चर्चा होती. पठार भागातील वाळूतस्करीची माहिती समजताच तहसीलदार सोनवणे यांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी पिकअपमध्ये पाठविले होते.

वाळूतस्करीसाठी पिकअपचा वापर होत असल्याने ही पिकअप थेट नदीपात्रात गेली. दरम्यान पिकअपमध्ये महसूलचे पथक असल्याचा सुगावा लागताच काही वाहने नदीपात्रातून पळवून नेण्यात आली. याचदरम्यान एक ट्रॅक्‍टर पथकाच्या हाती लागला. या ट्रॅक्‍टरमधून अवैध वाळूची वाहतूक केली जात होती. कारवाईसाठी ट्रॅक्‍टर ताब्यात घेऊन तो संगमनेरकडे आणण्यात येत असताना एका व्यक्तीने पथकाला विरोध केला. तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी स्वत: तेथे जात संबंधित ट्रॅक्‍टर ताब्यात घेऊन तो संगमनेरमध्ये आणला. याच परिसरात काही दिवसांपूर्वी जवळपास 42 ब्रास वाळूचा अनधिकृत साठा आढळून आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)