संगमनेर – आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारपासून (दि. 27) गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील 1 लाख 39 हजार 206 बालकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. सुरेश घोलप यांनी दिली.
तालुक्यातील आरोग्य विभागाच्या वतीने 909 ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, शाळाबाह्य मुलांनाही ही लस दिली जाणार आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देखील देण्यात आलेले आहे. सदरील मोहिमेसाठी बालरोगतज्ज्ञ संघटना, लायन्स क्लब, वैद्यकीय व्यावसायिक इत्यादी संघटनांचे सहकार्य लाभणार आहे.
लसीकरणानंतर मुलांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती देण्यासाठी शाळेतील शिक्षक, अंगणवाडी
सेविका व पालकांना पत्र देण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील 171 गावांमध्ये ध्वनिक्षेपकामार्फत प्रचार करण्यात येत आहे. पालकांनी आपल्या 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांना लस द्यावी, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती निशाताई कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा