गणेशोत्सव : सजावटीच्या वस्तू आता फायबर, कापडात

संगमनेर शहरात तयारी : प्लॉस्टिक बंदीवर यंदाच्या गणेशोत्सवात शोधला पर्याय

संगमनेर – शासनाने प्लास्टिक बंदी केल्याने गणेशोत्सवात सजावटीचा प्रश्‍न निर्माण झाला खरा पण काही कारागिरांनी यावर पर्याय शोधून काढला आहे. सध्या संगमनेर शहरातील बाजारपेठेत परवडतील अशा दरात कापडी सजावटीच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. फोम, फायबर, वुडन आणि कापडी मखर तसेच हारांचे पर्याय बाजारपेठेत दाखल झाले आहेत.
यंदापासून प्लास्टिकच्या तोरणाला पर्याय म्हणून झालरीचे कापडी तोरण हे नवीन आले आहे.

अनेक वर्षांपासून सजावटीसाठी थर्माकोलच पर्याय आहे, असा समज होता.विघटन न होणाऱ्या थर्माकोलमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यासाठी जनजागृती सुरू झाली. घरगुती गणपती तसेच मोठ्या गणेश मंडळांतही आरास केली जाते. त्यासाठी दरवर्षी फक्‍त प्लास्टिक व थर्माकोलपासून बनविलेले साहित्य वापरले जात होते. पण सध्या याला पर्यायी सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.

“प्लास्टिक बंदी झाल्यानंतर कापडी, मण्यांच्या हारांना मागणी आहे. शिवाय थर्माकोलला बंदी असल्याने फोम, कागदी मंदिर तसेच प्लायवूडपासून बनविलेले मखर लोकांच्या पसंतीस येत आहे.
-कृष्णा डंबीर, विक्रेता.

मोगरा कळी, निशिगंध कळी, गुलाब, झेंडू, जास्वंदीच्या कापडी फुलांच्या हारांनी शहरातील बाजारपेठ सजली आहे.ग्राहकांना परवडतील असे सत्तर रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतचे हार मिळत आहेत. शिवाय एक फुटी गणपतीपासून ते 15 फुटी गणपतीपर्यंतचे हार उपलब्ध झाले आहेत. तसेच फायबरच्या विविध प्रकारच्या मण्यांचे हारही बाजारात आले आहेत. यामध्ये चाळीस रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत मण्यांच्या माळा ग्राहकांना सोयीच्या ठरत आहेत. विविध डिझाईनचे फोममधील मखर ग्राहकांच्या पसंतीस येत आहेत. त्याची किंमत 1 हजार 500 रुपयांपासून साडेतीन हजारांपर्यंत आहे.

थर्माकोलला पर्याय फोमचा

थर्माकोलला बंदी आल्यानंतर बाजारात फोमचा वापर करून सजावटीचे साहित्य तयार केले जात आहे. थर्माकोलपासून बनविल्या जाणाऱ्या मखराला पर्याय म्हणून प्लायवूड, फायबर, कागदी मंदिरांना ग्राहकांची पसंती आहे. फोमचे विघटन होत नसल्याने ते वर्षानुवर्षे टिकतात तसेच ते फोल्ड करून ठेवता येतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)