शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना सहा रुपयांची मनिऑर्डर

विक्रीतून आलेले पैसे पाठवून वेधले कांदा दराकडे लक्ष : संगमनेर बाजार समितीतील प्रकार

संगमनेर – कांद्याच्या दरातील घसरणीकडे लक्ष वेधण्यासाठी संगमनेर तालुक्‍यातील अकलापूर गावातील श्रेयश संजय आभाळे या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना सहा रुपयांची मनिऑर्डर पाठवून कांदा भावाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी गुरुवारी (दि. 6) संगमनेर बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या 51 गोणी कांद्याचे त्यांच्या हाती केवळ सहा रुपये आले होते.

कांद्याचे भाव घसरल्याने सध्या शेतकरी अडचणीत आले आहेत. मातीमोल दराने कांदा विकण्याची वेळ आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यावर कडी करणारा अनुभव आभाळे यांना आला आहे. आभाळे यांनी दोन एकर क्षेत्रात कांद्याचे पीक घेतले. कष्टाने पिकवलेला 51 गोणी कांदा घेऊन ते संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आले. तेथील गगनगिरी ट्रेडिंग आडत व्यापाऱ्याकडे त्यांनी कांदा विक्री केली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला दोन रुपये 51 पैसे किलो, मध्यम प्रतीसाठी 75 पैसे किलो आणि हलक्‍या प्रतीसाठी 63 पैसे किलो दर कांद्याला मिळाला. त्यांनी 2 हजार 657 किलो कांदा आणला होता.

दोन रुपये 51 पैसे दराने 795 किलो, 75 पैसे दराने 268 किलो, 51 पैसे दराने 1 हजार 594 किलो कांद्याचे त्यांना 3 हजार 208 रुपये मिळाले. मात्र हा कांदा उतरवण्यासाठी हमाली, वजन करण्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च आणि वारई, असा मिळून 3 हजार 202 रुपये खर्च येऊन हाती आवघे 6 रुपये उरले. हा कांदा पिकवण्यासाठी जवळपास दोन लाख रुपये खर्च आल्याचे आभाळे यांनी सांगितले. अशा कवडीमोल भावाने बाजारात कांदा गेल्याने या सहा रुपयांची मनीऑर्डर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

“दोन एकर कांद्यासाठी माझा दोन लाख रुपये खर्च झाला. दुष्काळात पुरेसे पाणी उपलब्ध नसताना मी टॅंकरने पाणी विकत घेतले. विक्रीसाठी केलेल्या कांद्याचा खर्च जाता, माझ्या हाती 6 रुपये आले आहेत. या सहा रुपयांची मी मुख्यमंत्री साहेबांना मनीऑर्डर केली असून, यातून त्यांनी शेतीउपयोगी पुस्तके घेऊन शेतीचा आणि शेतीच्या अर्थकारणाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
-श्रेयश संजय आभाळे, कांदा उत्पादक शेतकरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)