महसूल अधिकाऱ्यांच्या घरी वाळूतस्करांची उठबस!

संग्रहित छायाचित्र

वाळू तस्करीला आळा बसणार तरी कसा? श्रीगोंदेकरांचा सवाल

श्रीगोंदा – तालुक्‍याच्या बहुतांश भागात राजरोसपणे वाळूतस्करी सर्रास सुरू असताना दुसरीकडे त्याच वाळूतस्करांची बड्या महसूल अधिकाऱ्यांच्या घरी रात्रीची उठबस सुरू आहे. वाळूतस्करी रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या महसूल कर्मचारी अन्‌ अधिकाऱ्यांचाच जर वाळूतस्करांना “आशीर्वाद’ असेल तर वाळूतस्करी थांबणार कशी?असा सवाल आता उपस्थित होत आहे.

तालुक्‍यातील नद्यांसह ओढ्या-नाल्यांतून देखील दररोज शेकडो ब्रास वाळूची दिवसाढवळ्या तस्करी सुरू आहे.वाळूतस्करी विरोधात अनेकांनी आवाज उठवून, आंदोलने करून देखील वाळूतस्करीला लगाम लावण्यात महसूल प्रशासनाला यश आलेले नाही. मध्यंतरी शिवसेनेने वाळूतस्करी विरोधात आवाज उठवून आंदोलन छेडले होते. यावेळी तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले की, तालुक्‍याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. त्यातच शासकीय वाहन नसल्याने वाळूतस्करी रोखणे जिकरीचे बनले आहे. मात्र वाळूतस्करी रोखण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करीत आहोत.

एकीकडे वाळूतस्करी विरोधात कारवाई करण्यासाठी शासकीय वाहन नसल्याचे कारण देत महसूल प्रशासनाने स्वतःची बाजू सावरली.प्रत्यक्षात वाळूतस्करांना “अप्रत्यक्षरित्या’ महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा “आशीर्वाद’ असल्याचे उघड सत्य आहे. तालुक्‍यातील भीमा नदी पट्टयात गेल्या कित्येक महिन्यांपासून दिवसाढवळ्या यांत्रिक बोटींच्या साहाय्याने वाळूतस्करी सुरू आहे. मात्र महसूल प्रशासन याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करीत आहे.

महसूल प्रशासनातील अनेक कर्मचारी अन्‌ अधिकारी श्रीगोंदे शहरात वास्तव्यास आहेत. श्रीगोंद्यात महसूल अधिकारी आणि वाळूतस्करांचे “अर्थ’पूर्ण संबंध अनेकदा चर्चेत राहिले आहेत. सध्या तालुक्‍यातील बेसुमार वाळूतस्करीमुळे वातावरण ढवळून निघाले असताना शहरातील महसूल अधिकारी अन्‌ कर्मचाऱ्यांना घरी वाळूतस्करांची उठबस होत असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे.दिवसभर शासकीय कार्यालयात असणाऱ्या महसूल कर्मचारी अन्‌ अधिकाऱ्यांच्या घरी रात्रीची वाळूतस्करांची होत असलेली उठबस चर्चेचा विषय बनली आहे. श्रीगोंदे शहरात राहणाऱ्या महसूल प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याच्या घरी शुक्रवारी (दि.8) रात्री वाळूतस्करांसह बैठक झाली. या बैठकीत तालुक्‍यात सध्या वाळूतस्करी विरोधात निर्माण होत असलेल्या असंतोषाबद्दल चर्चा झाल्याची माहिती समजते.

श्रीगोंद्याच्या बहुतांश भागात सुरू असलेली वाळूतस्करी रोखण्यात तालुक्‍यातील महसूल कर्मचारी अन्‌ अधिकाऱ्यांना अपयश आले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तालुक्‍यात दिवसाढवळ्या यांत्रिक बोटींच्या सहाय्याने शेकडो ब्रास वाळूची तस्करी केली जात असताना महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे तालुक्‍यात सुरू असलेल्या बेसुमार वाळूतस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिक करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)