वांगदरीत शेकडो ब्रास वाळूचा अवैध साठा

वांगदरी (ता. श्रीगोंदा) - तालुक्‍यातील वांगदरी येथे घोड नदीच्या काठावर वाळूतस्करांनी केलेला वाळूचा अवैध साठा. (छाया-समीरण नागवडे)

श्रीगोंदा  – तालुक्‍यातील वांगदरी येथे घोड नदीपात्रातून जेसिबी यंत्रांच्या सहाय्याने बेसुमार वाळूउपसा केला जात आहे. सात ते आठ जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने वाळूउपसा सुरू असल्याने वांगदरी येथे वाळूतस्करांनी शेकडो ब्रास वाळूचा अवैध साठा केला आहे.तालुक्‍यात बेसुमार वाळूतस्करी सुरू असताना महसूल प्रशासन मात्र “ढाराढुर’ असल्याची परिस्थिती पहायला मिळत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्‍यातील नद्यांच्या पात्रातून वाळूतस्करी केली जात आहे. मात्र आता नद्यांसह बहुतांश गावांत तस्करांनी ओढ्या-नाल्यांतून देखील वाळूउपसा करण्यास सुरुवात केली आहे. नद्यांमधील वाळूसाठे कमी झाल्याने तस्करांनी आपला मोर्चा ओढ्यांकडे वळवला आहे. तालुक्‍यात भीमा, घोड, हंगा नद्यांमधून दररोज शेकडो ब्रास वाळूची तस्करी केली जात आहे. घोड धरणाच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने घोड नदीला भरपूर पाणी आले होते; परिणामी काही दिवस वाळूउपसा थांबला होता. मात्र पाऊस थांबल्याने नदीचे पाणी आटू लागले आहे. त्यामुळे वाळूतस्करांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा वांगदरी येथील घोड नदीपात्राकडे वळवला आहे.

सध्या वांगदरी येथे सात ते आठ जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने बेसुमार वाळूउपसा केला जात आहे. वांगदरी येथे घोड नदी पात्राच्या काठावर वाळूतस्करांनी शेकडो ब्रास वाळूचा अवैध साठा केला आहे. वांगदरी येथे दिवसाढवळ्या वाळूउपसा सुरू आहे, एवढेच नव्हे तर वाळूतस्करांनी उघड्यावर निर्भयपणे शेकडो ब्रास वाळूचा अवैध साठा केला. यावरून वाळूतस्करांना महसूल प्रशासनाचे अजिबातही भय नसल्याचेच अधोरेखित होत आहे.

वांगदरी येथे दिवसाढवळ्या जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूउपसा केला जात असताना महसूल प्रशासन मात्र “ढाराढुर’ असल्याचीच परिस्थिती पहायला मिळत आहे. त्यातच वाळूतस्करी विरोधात महसूल प्रशासनाकडे तक्रारी करणारांची नावे वाळूतस्करांपर्यंत पोहचत असल्याने आता वाळूतस्करी विरोधात तक्रार करायला ग्रामस्थ घाबरायला लागले आहेत. तालुक्‍यात अवैधरित्या बेसुमार वाळूउपसा केला जात असताना महसूल प्रशासन वाळूतस्करीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. यातून महसूल प्रशासनातील अधिकारी अन कर्मचाऱ्यांचा वाळूतस्करांना छुपा “आशीर्वाद’ असल्याचेच अधोरेखित होत आहे.

अन्‌ दुपारी सुट्टी असतांनाही झाले पंचनामे

दैनिक “प्रभात’ने तालुक्‍यातील वाळूतस्करी विरोधात वृत्तमालिका सुरू केली आहे. रविवारी सकाळी “प्रभात’च्या प्रतिनिधीने वांगदरी येथील शेकडो ब्रासच्या अवैध वाळूसाठ्यांचे छायाचित्रे आणि चलचित्रे घेतल्याची कुणकुण लागताच महसूल विभागाने पळापळ करून रविवारी शासकीय सुट्टी असताना देखील दुपारनंतर वांगदरी येथे कारवाई करीत घोड नदी काठावरील अवैध वाळूसाठे जप्त करीत त्यांचा पंचनामा करण्याचा फार्स केला. या वाळूसाठ्यांचा जागीच लिलाव करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)