केसपेपरला पावतीच नाही

साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयातील प्रकार : रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार

शिर्डी – साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात केस पेपरसाठी रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या दहा रुपयांच्या शुल्कावर रीतसर पावती दिली जात नसल्याचा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. हा प्रकार गेल्या महिन्यांपासून सुरू असल्याचे समजते.

-Ads-

शिर्डीतील साईबाबा विश्‍वस्त व्यवस्थेने गोरगरिबांसाठी साईनाथ रुग्णालयाची निर्मिती केली. रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेण्यासाठी बाहेर गाववरून दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण येत आहेत. साईनाथ रुग्णालयाची सेवा मोफत असतानाही शुल्क आकारण्यात येत असल्याने गोंधळ उडाला आहे. रुग्णालयाच्या प्रारंभीच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर केसपेपर काढण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी मागील एक महिन्यापासून रुग्णांकडून केसपेपरसाठी आकारण्यात येणाऱ्या दहा रुपये शुल्काच्या बदल्यात कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नसल्याचे रुग्णांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर सर्रासपणे हा प्रकार होत अहे. रुग्णांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. रुग्णालय प्रशासनाने आकारण्यात आलेल्या नवीन आणी जुन्या केसपेपरसाठी दहा रुपयांची पावती द्यावी, अशी एकमुखी मागणी रुग्णांनी केली. साईबाबा विश्‍वस्त व्यवस्थेच्या दोन्ही रुग्णालयात प्रभारी अधीक्षक असल्याने दोन्हीही रुग्णालयात नियोजन ढासळत असल्याचे यानिमित्त स्पष्ट होत आहे.

मध्यंतरीच्या काळात साईबाबा विश्‍वस्त व्यवस्थेने श्री साईबाबा सुपरस्पेशालिटी आणि साईनाथ रुग्णालयासाठी वृत्तपत्रात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय पदे भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मात्र यामध्ये वैद्यकीय अधीक्षकपदाची जाहिरात जाणीवपूर्वक न दिल्याची चर्चा आहे.

हिशोबात घोळ नाही : औटी

साईनाथ रुग्णालयातील केसपेपरसाठी आकारण्यात आलेले दहा रुपये शुल्क बरोबर आहे. संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून सर्व रजिस्टर चेक केले असता हिशोबाचा ताळमेळ बरोबर असल्याचे प्रशासकीय अधिकारी अशोक औटी यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांची सारवासारव…

आम्ही रुग्णांना पावत्या देत असल्याची सारवासारव त्यांनी केली. रुग्णांनी पावत्या घेतल्या नाहीत तर आम्हाला सांगता येणार नाही, असा आव आणत यापुढे असे होणार नसल्याची ग्वाही कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)