कालव्यांसाठी साई संस्थानकडून 125 कोटींचा पहिला हप्ता मंजूर

संग्रहित छायाचित्र..

कोपरगाव  – जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या निळवंडे धरणांचे कालवे अनेक वर्षांपासून रखडले आहेत. आता या कामासाठी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानकडून पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्याचा पहिला हप्ता 125 कोटी रुपये या कामासाठी जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यास मान्यता मिळाली आहे.

विधी व न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी स. पु साळुंके यांच्या स्वाक्षरीने हा अध्यादेश काढण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त बिपीन कोल्हे व आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली. यासाठी प्रकरणांचा मोठ्या प्रमाणांत पाठपुरावा केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे करण्यांत आल्याचेही त्यांनी सांगितले.

या निर्णयाचा फायदा कोपरगाव तालुक्‍यातील मनेगाव, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, जवळके, बहादरपूर, शहापूर, बहादराबाद, वेस, सोयगाव, निमगाव व काकडी या जिरायती गावांना होणार आहे. या अकरा गावांतील पाच हजार 666 हेक्‍टर म्हणजेच 14 हजार 165 एकर क्षेत्र संचनाखाली येणार आहे.

साईबाबा संस्थानचे विश्‍वस्थ कोल्हे म्हणाले, निळवंडे धरण व कालव्यांची कामे रखडल्यामुळे ते मार्गी लागावेत, यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली या भागातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा रास्तारोको आंदोलने केली. त्याचप्रमाणे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हे काम मार्गी लागावे, यासाठी केंद्र व राज्यस्तरावर तसेच प्रत्येक अधिवेशन काळात बैठका घेतल्या.

साईबाबा संस्थान शिर्डी समाधी शताब्दी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यपाल आले असता त्यांनाही या कामाचे गांभीर्य पटवून देण्यात आले. त्यामुळे साईबाबा संस्थान विश्‍वस्थ मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे व सर्व विश्‍वस्थांनी एकमुखी निर्णय करून निळवंडे धरण कालव्याच्या कामासाठी पाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय मंजूर केला.

परिणामी त्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. हा निर्णय होण्यापूर्वी दोन दिवस आधी जलसंपदामंत्री महाजन यांची आमदार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. त्यांनी देखील हे काम सहा महिन्यांत मार्गी लावण्यांचे आश्वासन दिले त्याला या अध्यादेशामुळे पुष्टी मिळाली आहे. या अकरा गावांतील शेतकऱ्यांनी 125 कोटी रुपये पहिल्या हप्त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री महाजन तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक यांचे आभार मानले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)