दरोड्याची पपड्याची पद्धतही नांगऱ्यासारखीच

सुनील चव्हाण यांच्यामुळे खबऱ्यांनी दिली माहिती; तीन आठवड्यांत तपास

नगर – रहदारीची वेळ निवडायची; ती पण सायंकाळची. या वेळेत प्रत्येकजण गडबडीत असतो. काम उरकण्याची घाई असते. त्याच वेळी गोंधळ निर्माण करायचा. दंगलसदृश परिस्थिती निर्माण करायची. धावपळ करत आरडाओरडा करायचा. गोंधळात अधिक भर पडण्यासाठी फटाके फोडायचे. वेळप्रसंगी हातबॉम्ब फोडायचा. दगडफेक करायची. अशा गोंधळातच टार्गेटजवळ पोहचायचे. तिथे थेट गोळीबार करायचा आणि आपल्याला हवे ते साध्य करायचे. कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथील गणेश आणि शाम धाडगे यांच्या लक्ष्मी ज्वेलर्सवर 19 ऑगस्टला सायंकाळी टाकलेल्या दरोड्यासाठी वापरलेली ही पद्धत! ही पद्धत 2006-07 मध्ये नांगऱ्या टोळीची होती. तीच पपड्‌याच्या टोळीचीही पद्धत आहे.

नांगऱ्या टोळीने त्या वेळी राज्यभर याच पद्धतीने दरोडे टाकले होते. दीपक युनूस काळे ऊर्फ नांगऱ्या सध्या तुरूंगात आहे. मग हा दरोडा कोणी टाकला, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. नांगऱ्या आणि त्याच्या साथीदारांच्या गुन्हेगारीच्या पद्धतीचा अभ्यास सुनील चव्हाण यांनी चांगलाच केला होता. नांगऱ्याला गजाआड करण्यात त्यांचा मोठा उपयोग झाला होता. कोळपेवाडीला दरोडा पडताच चव्हाण यांनी त्यांच्या खबऱ्यांमार्फत शोध घ्यायला सुरुवात केली. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आणि अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मध्यस्थीने भेट घेतली. दरोड्याच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

शर्मा आणि मीना यांनी त्यांना त्यांच्या पद्धतीने तपास करण्यास सांगितले. चव्हाण यांनी त्यांच्या विशिष्ट समाजातील खबऱ्यांशी संपर्क साधला. घटनेची माहिती दिली. खबऱ्यांनी माग काढण्यास सुरूवात केली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बीडमधील एका खबऱ्याकडून माहिती मिळाली. किरण बंडू काळे (रा. नेवासे) हा बीडमध्ये एका सावकाराकडे आला होता. त्याने तिथे काही पैसे दिले. किरण हा कुख्यात दरोडेखोर पपड्या ऊर्फ संजय ऊर्फ राहुल व्यंकटी ऊर्फ महादू ऊर्फ महादेव ऊर्फ गणपती काळे (रा. वर्धा) याच्या संपर्कात आला होता. चव्हाण यांनी या माहितीला पुष्टी मिळावी, म्हणून पपड्याचा माग काढला. पपड्या खुनाच्या गुन्ह्यात 13 वर्षांपासून तुरुंगात होता. लग्नाचे कारण देत तो पॅरोलवर बाहेर आला होता. तो सतत जागा बदलून राहत असल्याची माहिती चव्हाण यांना मिळाली. याच दरम्यान, औरंगाबाद येथे अजय बंडू काळे (रा. नेवासे) हा दुचाकीच्या चोरीत सापडला.

कोळपेवाडी येथील दरोड्यात दरोडेखोरांनी चोरीच्या दुचाकी वापरल्या होत्या. अजय हादेखील दरोड्यानंतर जागा बदलून राहत होता. चव्हाण यांनी ही माहिती पवार यांच्या कानावर घातली. पवार यांनी विलंब न घालविता अजयला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर किरण, राजकुमार नारायण काळे, जितू रामदास भोसले, महेंद्र बबुशा पवार, विक्रम रजनीकांत भोसले, अक्षय भीमा जाधव व बुच्या रामदास भोसले यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांना ओळखण्यासाठी पोलिसांनी दरोड्याच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रफितीचा अभ्यास केला.

सुरुवातीला दरोडेखोरांचे टार्गेट औरंगाबाद होते; परंतु नंतर त्यांनी कोळपेवाडी येथे दरोडा टाकण्याची योजना केली. त्यासाठी गुन्ह्याची कार्यपद्धती जुनीच ठेवली. दरोड्याच्या ठिकाणी जाताना दरोडेखोरांनी मोबाईल बंद करून ठेवले होते. त्यामुळे पोलिसांना दरोडेखोरांचा माग काढणे हे दिव्यच होते. चव्हाण यांच्या जुन्या खबऱ्यांच्या जाळ्यामुळे ते शक्‍य झाले.

खुनातील दरोडेखोर पॅरोलवर कसा?

या दरोड्याचा मास्टर माईंड पपड्या आहे. तीन खुनाच्या गुन्ह्याची नोंद त्याच्याविरुद्ध आहे. फौजदाराच्या खुनाचा गुन्ह्या त्याच्यावर आहे. दीपक युनूस काळे ऊर्फ नांगऱ्याच्या अगोदर ही टोळी पपड्या चालवित होता. पपड्याने महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातदेखील दरोडे घातले. 2002 मध्ये पपड्याने दरोडे घालताना तीन खून केले. तो 2005 पासून तुरुंगात होता. या खुनाच्या गुन्ह्यात तो पॅरोलवर बाहेर आला होता. कुख्यात दरोडेखोर असताना तो पॅरोलवर कसा असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. दुकानावर महिलांमार्फत टेहाळणी करायची.

महिला दुकानासमोरील प्रत्येक हालचालीची माहिती पपड्याला पुरवायची. त्यानुसार पपड्या नियोजन करायचा. दरोड्यानंतर टोळीतील प्रत्येकाला एक लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. दरोडा घातल्यानंतर प्रत्येकाने जंगलाच्या वाटेने पायी 10 ते 12 किलोमीटर पायी जायचे हे ठरले होते. पपड्याने आखलेल्या कार्यपद्धतीनुसारच हा दरोडा घालण्यात आला. कोळपेवाडीच्या दरोड्यात वापरलेली हत्यारेदेखील पपड्याने उपलब्ध केली होती.

अटक व्हायचे आरोपी

पपड्या, श्रीमंत ईश्‍वर काळे, सुंदरलाल रंधवा भोसले, शहाराम छगन भोसले, पप्पू उर्फ प्रशांत रजीकऱ्या भोसले, शंकर गोरख भोसले, अक्षय संतोष चव्हाण, क्रांती कांतिलाल भोसले, लखन कांतिलाल पवार, उमेश कांतिलाल पवार, कांतिलाल पवार, मीनाक्षी राहुल काळे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)