कोळपेवाडी दरोड्यात लुटलेले 38 लाखांचे दागिने जप्त

औरंगाबादमधील तीन सराफांना अटक : दरोड्यातील पपड्याच्या दोन मुलांसह तिघांना अटक

नगर – कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथे दरोड्यात लुटून नेलेले दागिने औरंगाबाद येथील सराफाकडून जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी यश आले आहे. पोलिसांनी दागिने विकत घेणाऱ्या औरंगाबादमधील तीन सराफांना अटक केली. एक किलो सोन्याचे दागिने, दोन किलोची चांदी, असा एकूण 38 लाख 69 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अक्षय सुरेश बिरारे (वय 22), राहुल अशोक बिरारे (वय 28, दोघे रा. बोरगांव, फुलंब्री, औरंगाबाद) व अनिल शिवाजी बाबर (वय 40, रा. औरंगाबाद) या तीन सराफांसह त्यांना दागिने विकणारे दरोड्यातील आरोपी पवन सागर पवार ऊर्फ पवन तुकाराम चव्हाण ऊर्फ पवन पपड्या काळे (वय 19), शुभम सागर पवार ऊर्फ शुभम तुकाराम चव्हाण ऊर्फ शुभम पपड्या काळे (वय 20, दोघे रा. कार्ला चौक, सुदर्शननगर, वर्धा), किशोर कांतीलाल भोसले (वय 22, रा. हासनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना) यांना अटक करण्यात आली आहे.

कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर 19 ऑगस्टला सायंकाळी दरोडेखोरांना दरोडा टाकून लूट केली होती. दरोडेखोरांनी यात दुकानमालकांवर गोळीबार केला होता. शाम धाडगे यांना दरोडेखोरांनी जवळून गोळी मारली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शाम यांचे बंधू गणेश यांच्यावर देखील दरोडेखोरांनी गोळीबार केला होता. गणेश हे गंभीर जखमी झाले होते. दरोडेखोरांनी या दुकानातून मोठ्या प्रमाणात दागिने चोरून नेले होते. स्थानिक गुन्हे शाखेने तपासात पपड्या ऊर्फ संजय ऊर्फ राहुल व्यंकटी ऊर्फ महादू ऊर्फ महादेव ऊर्फ गणपती काळे (रा. वर्धा) याच्या टोळीने हा दरोडा घातल्याचे उघड केले.

या दरोड्यात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आठ जणांना अटक केली होती. यांच्याकडे चौकशी केल्यावर दरोड्यातील दागिने औरंगाबाद येथील सराफांना विकल्याची माहिती समोर आली. दागिने विकण्यात पपड्याच्या मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस कर्मचारी सुनील पवार यांनी व त्यांच्या टीमने त्यानुसार तपास सुरू केला. जालना येथे जाऊन पोलिसांनी पपड्याच्या मुलांना ताब्यात घेतले. पोलिसांना पपड्याच्या मुलांनी दागिने औरंगाबादमधील अक्षय बिरारे, राहुल बिरारे व अनिल बाबर या तीन सराफांना विकल्याची नावे सांगितली.

पोलिसांनी त्यानुसार या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांनी हे दागिने पवन काळे, शुभम काळे व किशोर भोसले यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यावेळी या तिघांबरोबर आणखी तिघे जण होते, अशीही सरफांकडून माहिती मिळाली. या सराफांनी हे दागिने विकत घेतल्याचे सांगितले. घेतलेल्या दागिन्यांपैकी सोने आणि चांदीचे काही दागिने वितळविल्याचे समोर आले. वितळविलेल्या दागिन्यांसह सराफांकडून सोन्या-चांदीचे सुमारे 38 लाख 69 हजार 400 रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)