निसर्गप्रेमींचे जिल्हास्तरीय सर्वेक्षण : 22 निरीक्षकांनी केल्या नोंदी, अहवाल अभ्यासकांकडे जाणार
जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशी रानफुले
जिल्हाभरातील विविध भागात यावर्षी पंद, पिवळी तिळवण, धोतरा,कल्प, गुलबक्षी, दहान, रानतेरडा व पाणतेरड्याच्या प्रजाती, शिंदळवन, सोनकी, पित्तपापडा, नीसुरडी, सोनसरी, घोडेगुई, झरवड, चिमनाटी, तुंबा, कल्प, विविध रंगी घाणेरी, कुरडू, बेरकी, गुलाबी, पिवळी व दुरंगी बाभुळ, आघाडा, रानकराल, कालमाशी, वासका, चिमनाटी, सोळन आदी रानफुलांचे वेगळेच वैशिष्ट्य आहे.
नगर – पावसाळा ऋतू म्हणजे निसर्गप्रेमींसाठी निसर्ग निरीक्षणाची पर्वणीच! या निसर्ग सौंदर्यात भर घालत असतात ते विविधरंगी रानफुले व त्यावर बागडणारे रंगबेरंगी फुलपाखरे. या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यात निसर्गप्रेमी साताऱ्यातील महाबळेश्वरजवळील मव्हॅली ऑफ फ्लॉवर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कासपठार याठिकाणी हजारोंच्या संख्येने दाखल होतात.
नगर जिल्हासुद्धा या रानफुलांसाठी व फुलपाखरांसाठी खुपच समृद्ध आहे. हे सिद्ध करण्यासाठी तथा जिल्ह्यातील जैवविविधता वाढविण्याच्या उद्येशाने निसर्ग अभ्यासक तथा शिक्षक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली 22 निरीक्षकांनी सलग तिसऱ्या वर्षी या रानफुलांचे व फुलपाखरांचे संपूर्ण जिल्हाभर फिरून सर्वेक्षण केले.
फुलपाखरांची छायाचिञे
नगर जिल्ह्यात यावर्षी सर्वञ कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. तरी देखील रानफुलांचे हे वैभव जंगले, डोंगराळ भाग व पानथळ क्षेञात अनुभवाला मिळत आहे. संदीप राठोड, शिवकुमार वाघुंबरे, अनमोल होन, डॉ.अशोक कराळे, ज्योती जाधव, राजेंद्र बोकंद, विकास सातपुते, शैलजा नरवडे, सुधीर दरेकर, स्नेहा ढाकणे, किशोर विलायते आदींनी निरीक्षणात सहभाग घेतला होता.
भंडारदरा, हरिश्चंद्रगड ही ठिकाणे वैविध्यपूर्ण प्रजातींच्या रानफुले व फुलपाखरांसाठी अतिशय वैभव संपन्न असल्याचे आढळून आले. पेमगिरी, विळदघाट, वृद्धेश्वर, करंजीघाट, मोहटे, मुळा, जायकवाडी धरण परिसर, आगडगाव, डोंगरगण, गर्भगिरी आदी ठिकाणीही रानफुलांची वैविध्यता दिसून आली.
– जयराम सातपुते, निसर्ग अभ्यासक
रानफुलांची छायाचिञे
रानफुले व फुलपाखरांचे हे सर्वेक्षण नगर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात दरवर्षी केले जाते. त्याचा अहवाल वरिष्ठ निसर्गअभ्यासक सस्थांना पाठवला जाणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले. यावर्षीच्या सर्वेक्षणात निरीक्षकांनी जिल्हाभरात सुमारे 98 प्रजातींच्या आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण पावसाळी रानफुलांच्या प्रजातींची, सुमारे 32 प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद छायाचिञणासह घेतली आहे.
यांची शास्त्रशुद्ध ओळख पटविण्याच्या कार्यात वनस्पती अभ्यासक शैलेंद्र पाटील व चंद्रशेखर मराठे यांचे सहकार्य लाभले. जिल्ह्यातील निसर्गवैभवाची जैवविविधता टिकून रहावी व वृद्धिंगत व्हावी, याचप्रमाणे निसर्गातील दुर्मिळ प्रजातींचे रक्षण व संवर्धन व्हावे या उद्देशाने रानफुलांचे सर्वेक्षण करत असतानाच आकर्षक, दुर्मिळ तथा औषधी प्रजातींच्या रानफुलांच्या बियांचे संकलन व रोपणही निरीक्षकांनी केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा