आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करा

रामदास आठवले यांची केंद्राकडे मागणी; रिपाइंचा मेळावा

मनपाची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर

नगरमधील वक्‍त्यांनी मनपा निवडणुकीचा विषय काढला. भारतीय जनता पक्षाशी युती झाली, तरी ही निवडणूक पक्ष स्वत:च्या चिन्हावर लढविणार असल्याचे पत्र आयोगाला दिले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. भाजपशी झालेल्या चर्चेत आरपीआय (ए) ला 9 राखीव, 1 अनुसूचित जाती-जमाती आणि 3 खुल्या जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी माजी नगरसेवक अजय साळवे यांनी केली.

नगर – मराठा आरक्षणाला भारतीय रिपब्लीकन पक्षा (आठवले गटा)चा पाठिंबा आहे. पटेल, मराठा, धनगर, जाट, राजपूत, मुस्लीम आदी समाजांना आरक्षण मिळाले पाहिजे; मात्र मूळ आरक्षणाला धक्का लागता कामा नये. यासाठी आरक्षण 50 टक्‍क्‍यावरून 75 टक्‍क्‍यांवर नेण्याचा कायदा करावा, अशी मागणी मी केंद्र सरकारकडे सातत्याने केली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पक्षाच्या वतीने आयोजित मेळाव्यात आठवले बोलत होते. ते म्हणाले, की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीने अलिकडच्या पाच-सहा वर्षांत जोर धरला आहे; मात्र मराठा समाजास आरक्षण द्यावे, ही मागणी मी 25 वर्षांपूर्वी केली होती. मराठा समाजाला अंगावर घेण्यापेक्षा मित्र म्हणून गळ्यात गळा घालायला हवा. आरक्षणाच्या नावाखाली गळा कापायला नको.

छत्रपती शिवरायांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार एकत्र आल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलेल. बाबासाहेबांना आणखी पाच-सात वर्षांचे आयुष्य लाभले असते, तर कदाचित 1957 मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले असते. डॉ. आंबेडकरांनी राममोहन लोहिया यांना लिहिलेल्या पत्रात भारतीय रिपब्लीकन पक्ष हाच कॉंग्रेसला पर्याय ठरला असता. हा सक्षम पक्ष बनला असता.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी माझा पराभव घडवला. मी हरलो नाही, तर हरवला गेलो, म्हणून मी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची साथ सोडली आणि भाजप-शिवसेनेला जवळ केले, अशा शब्दांत दोन्ही कॉंग्रेसवर टीका करून आठवले म्हणाले, “”मोदी सरकार आल्यानंतर संविधान बदलले जाईल, अशी भीती व्यक्‍त होत होती; मात्र मोदी यांनीच संविधान हा माझ्यासाठी धर्मग्रंथ आहे, अशी भूमिका घेतली. त्यांनी ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी कायम ठेवण्याचा कायदा केला.

दलितांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचा विश्‍वास बाळगा. कॉंग्रेसला जे कधीच आठवले नाही ते मोदी सरकारला आठवले. दिल्लीमध्ये डॉ. आंबेडकरांचे मोठे स्मारक उभे राहिले. जनपथ मार्गावर आंबेडकरांचा पुतळा उभारला. मुंबईतील इंदू मिलच्या जागेत बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याची कल्पना पुढे आली. लंडनमधील डॉ. बाबासाहेबांचे घर महाराष्ट्र सरकारने विकत घेतले, हे कॉंग्रेसला कधीच आठवले नाही. त्यांना फक्‍त दलितांची मते दिसली.”

आजचा मेळावा हा कुणी पक्षात प्रवेश करणार आहे, म्हणून नाही तर आजचा मेळावा हा आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू, अहल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांचा विचार रुजवण्यासाठी आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, बेरोजगार, मराठा, ख्रिश्‍चन अशा सर्व वंचितांचे प्रश्‍न मांडण्यासाठी आहे. बेरोजगारांना रोजगार, भूमीहिनांना पाच एकर जमीन, झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर, मराठा समाजाला आरक्षण, ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होणार नाही, हे सांगण्यासाठी आजचा मेळावा आहे.

दलित महामंडळांचे कर्ज माफ होण्यासाठी, दलित-मराठा जोडण्यासाठी, मातंग, चर्मकारांना न्याय मिळवून देण्यासाठी, गल्ली ते दिल्ली जोडण्यासाठी, नगर-मुंबईला जोडण्यासाठी, माणसाच्या मनात संविधानाबद्दलची ज्योत पेटवण्यासाठी, गरीबांना श्रीमंत करण्यासाठी हा मेळावा आहे, असे त्यांनी सांगितले. राजू गुजर, नलिनी गायकवाड, शिवाजी बोंडके, अनिता मकासरे यांनी या मेळाव्याच्या प्रारंभी पक्षात प्रवेश केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)