पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

संग्रहित छायाचित्र

तालुका पाणी बचाव समितीचा चार दिवसांपासून ठिय्या : 13 नोव्हेंबरला बैठक

अकोले – अकोले तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी मंत्रालयात 13 नोव्हेंबरला पालकमंत्र्यांनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर अकोले तालुका पाणी बचाव संघर्ष कृती समितीने मागील चार दिवसांपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अकोले तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय अकोले तालुका पाणी बचाव कृती समितीच्या वतीने रविवारपासून (दि.28) प्रवरा नदीवरील अगस्ती पुलावर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यापूर्वी समितीने तालुक्‍यात दौरे करून शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे काम केले होते. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केले.

या पार्श्वभूमीवर जायकवाडी आवर्तन सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यास निर्णायक विरोध करण्यासाठी डॉ. अजित नवले, महेश नवले, शांताराम वाळुंज, खंडू वाकचौरे आदींनी आ. वैभवराव पिचड यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अगस्ती पुलावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्याच रात्री खासदार सदाशिव लोखंडे यांनी अकोले येथे येऊन आंदोलनात सहभाग घेतला. भाजपचे शिवाजी धुमाळ हेही सहभागी झाले. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे व शिवाजी धुमाळ यांनी पालकमंत्री शिंदे यांच्याशी संपर्क केला.

तसेच तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री शिंदे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यांना पालकमंत्री म्हणून तालुक्‍याची कैफियत ऐकवली. तसेच अकोले दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्याचा विचार करावा, अशी आग्रही भूमिका मांडली. त्यावर येत्या 13 नोव्हेंबरला मंत्रालयात तालुका पाणी बचाव कृती समितीला पाचारण करून बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पालकमंत्र्यांचे पत्र आज दुपारी प्रांताधिकारी भागवत डोईफोडे व पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी आंदोलकांना दिले. त्यावर आ. वैभवराव पिचड यांच्याशी डॉ. नवले यांनी चर्चा केली. यावेळी हे आंदोलन तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय आ. पिचड यांनी घेतला. वाकचौरे, धुमाळ यांच्या मोबाईलवर पालकमंत्री शिंदे यांनी डॉ. नवले यांच्याशी संवाद साधला. तसेच बैठकीला सर्व कार्यकर्त्यांनी हजर राहावे, असे आवाहन केले.

डॉ. नवले, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मीनानाथ पांडे, गिरजाजी जाधव, शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, मनसेचे दत्ता नवले, भाकपाचे कारभारी उगले, शांताराम वाळुंज, शेतकरी संघटनेचे शरद देशमुख, अशोकराव आरोटे, आरपीआयचे विजयराव वाकचौरे, कॉंग्रेसचे निखील जगताप, विकास वाकचौरे आदी कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा प्रस्ताव मान्य करून आंदोलन तूर्तास पुढे ढकलले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)