शासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये

पालकमंत्री राम शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना : टंचाई आढावा बैठखीत विविष विषयांवर चर्चा

जनतेच्या अडचणी समजावून घ्या

प्रत्येक गावाचा दुष्काळी आराखडा तयार केला असल्याचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी सांगताच आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सरपंच व ग्रामसेवकांना पत्र दिली का? असा प्रश्‍न केला. मात्र मुंडे त्यावर उत्तर देऊ शकले नाहीत. यावर कागद रंगवण्यापेक्षा प्रत्यक्ष लोकांच्या अडचणी समजावून आराखडे पुन्हा तयार करण्याची सूचना कर्डिले यांनी केली. तसेच बांधकाम विभागाने कुठलेच नियोजन न केल्याने नाराजी व्यक्त केली.

पाथर्डी – पाथर्डी तालुका सध्या भीषण दुष्काळाला सामोरे जात आहे. प्यायला पाणी, जनावरांना चारा, हातांना काम, अशा विविध अडचणी जनतेसमोर उभ्या आहेत. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी या संकटकाळात मुख्यालय सोडू नये, अशा सूचना पालकमंत्री राम शिंदे यांनी टंचाई आढावा बैठकीत दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाथर्डी तालुक्‍यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी पालकमंत्री शिंदे यांनी तालुक्‍याचा दौरा करून टंचाईसदृश गावांना भेटी दिल्या व प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर तहसील कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आ. मोनिकाताई राजळे, आ. शिवाजीराव कर्डिले, निवासी जिल्हाधिकारी प्रशांत पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, अर्जुनराव शिरसाठ, सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकाण, सुनील ओहळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, विभाग प्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री शिंदे म्हणाले, दुष्काळात अडचणीत असलेल्या नागरिकांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभे आहे. उपाययोजना करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही. मात्र प्रशासनाकडून योग्य नियोजन होण्याची गरज आहे. तालुक्‍यात खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आहेत. वाडी-वस्तीवरील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळायला हवे. हुमणी अळीच्या नुकसानभरपाईबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. लोडशेडिंग व्यतिरिक्त जास्त काळ वीज खंडित होऊ नये. तसेच टंचाई काळात कुठल्याही पाणीपुरवठा योजनेची वीज बंद करू नये. याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी.

प्रशासनाने दुष्काळासाठी आठ कोटी 20 लाखांचा आराखडा तयार केला आहे. परंतु परतीचा पाऊस न झाल्याने त्यात आणखी दुरुस्ती करण्याची गरज असून, दोन दिवसांत नवीन प्रस्ताव तयार करावा. टंचाईकाळात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबीही ना. शिंदे यांनी यावेळी दिली.

आ. राजळे म्हणाल्या, पाथर्डी तालुक्‍यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्येच नियोजन करावे लागत आहे. पाथर्डी तालुक्‍यात सध्या 53 टॅंकर सुरू आहेत. भविष्यात ही संख्या दीडशेवर जाण्याची शक्‍यता आहे. जायकवाडी योजनेच्या दुरुस्ती खर्चासाठी 79 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. यासाठी जिल्हा नियोजन बैठकीची वाट न पाहता तत्काळ मंजुरी द्यावी. महावितरणबाबत तक्रारी वाढल्या आहेत. लोडशेडिंगमुळे पाणी मिळत नाही. त्यामुळे ते कमी करावे, अशी सूचना आ. राजळे यांनी केली.

तालुक्‍यात 53 टॅंकरद्वारे 114 खेपा

तालुक्‍यात सध्या 53 टॅंकरद्वारे 40 गावांना 114 खेपांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये 25 टॅंकर अमरापूर, 21 टॅंकर खंडोबा माळ, तर 7 टॅंकर पांढरीपूल येथे भरले जात असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली. तर तालुक्‍यात चाळीस दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याचे कृषी अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले. त्यावर प्रत्यक्ष पाहणी न करताच आकडेवारी सांगितली जात असल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला. त्यामुळे फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना पालकमंत्री शिंदे यांनी कृषी विभागाला दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)