घोड, कुकडीचे आजपासून आवर्तन- प्रा. शिंदे

मागणी होताच दुसऱ्या दिवशी टॅंकर चालू करा

टंचाई आढावा बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी

टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री शिंदे यांनी विभागवार आढावा घेतला. मात्र यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गौतम बनकर हे गैरहजर होते. ना. शिंदे यांनी त्यांना बोलावून घेण्याची सूचना केली. मात्र बऱ्याच अवधीनंतर बनकर हे सभागृहात हजर झाले. दरम्यान, बैठकीसाठी सर्व विभागाच्या खातेप्रमुखांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. काही अधिकाऱ्यांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत बैठकीला दांडी मारली. याबाबत तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले, जे अधिकारी या बैठकीला गैरहजर होते, त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावणार आहे.

श्रीगोंदा – जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. तालुक्‍यातील पाण्याची आवश्‍यकता लक्षात घेऊन घोड आणि कुकडी दोन्ही कालव्यांना उद्यापासून (दि.25) आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ना. शिंदे यांनी बुधवारीपासून जिल्ह्यात तालुकानिहाय टंचाई आढावा बैठकीला प्रारंभ केला असून आज श्रीगोंदा तालुक्‍याचा दौरा केला. दुपारी पंचायत समितीत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी ना. शिंदे यांनी तालुक्‍यातील सारोळा सोमवंशी आणि घुटेवाडी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ना. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात दुष्काळाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. सर्वांनी एकत्रित मिळून दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.नियोजन फक्त कागदावर करून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागणार आहे. टॅंकरचा प्रस्ताव आला की त्याला लगेच मंजुरी देऊन दुसऱ्या दिवशी टॅंकर सुरू करा, शेतकऱ्यांचे विज कनेक्‍शन तोडू नका, वीजरोहित्र तात्काळ बदलून द्या असे आदेश ना. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कुकडीचे आवर्तन उद्या (25) सुटणार असल्याचे सांगताच उपस्थित घोड खालील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत घोडचे 5 नोव्हेंबरला सुटणारे आवर्तनदेखील उद्यापासून सोडण्याची मागणी केली. त्यावर ना. शिंदे यांनी घोडचे आवर्तनही उद्यापासून सोडणार असल्याचे सांगितले.

ना. शिंदे म्हणाले, चारा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करा, तसेच दुष्काळात मागेल त्याला तातडीने रोजगार मिळेल, यासाठी नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी देतानाच विविध खात्यांकडून आकडेवारी घेऊन भविष्यात किती जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. याची माहिती घेतली तसेच कालव्यावर पाईप टाकून होणाऱ्या पाणी चोरीबाबत देखील उपाययोजना केली जाईल. कुकडीच्या आवर्तनामधून सुरुवातीला विसापूर आणि अन्य तलावामध्ये पाणी सोडले जाईल असे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक करताना सभापती पुरुषोत्तम लगड म्हणाले, तालुक्‍यात सद्यस्थितीत 34 पाण्याच्या टॅंकरची आवश्‍यकता आहे. चाऱ्या छावण्या होणे गरजेचे आहे. तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले, तालुक्‍यात यावर्षी 53 टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. तालुक्‍यात सर्वांत कमी पाऊस मांडवगण मंडळात झाला आहे. टंचाई आराखडा तयार केला आहे’.

माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, भाजप सरकारने ऑक्‍टोबर महिन्यातच दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. चारा छावण्या लवकर सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. आमदार राहुल जगताप म्हणाले, तहसीलदारांना टॅंकर सुरू करण्याचे अधिकार द्यावेत, तसेच आरक्षित तलावातील शेतकऱ्यांच्या मोटारी आवर्तनकाळात बंद करू नयेत अशी सूचना केली. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, घोड, कुकडीचे नियोजन करून सर्वांना पाणी द्यावे, आवर्तनाचे पाणी आधी तलावांमध्ये सोडले जावे अशी सूचना केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, नगराध्यक्ष मनोहर पोटे, घनश्‍याम शेलार, सदाशिव पाचपुते, राजेंद्र म्हस्के, सुवर्णा पाचपुते, सुनीता हिरडे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)