खरीप हंगाम गेले वाया; रब्बीची पेरणी खोळंबली

संग्रहित फोटो

पावसाने ओढ दिल्याने खरीप उत्पादनात 60 टक्‍के घट; पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्यावरही परिणाम

जायकवाडीचे भूत आता मानगुटींवर

जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिकांची स्थिती वाईट झाली आहे. परंतू आता पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होण्याची दाट शक्‍यता आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये भंडारदरा शंभर टक्‍के भरले असून उर्वरित धरणे अद्यापही भरली नाहीत. आजही मुळा 73 टक्‍के, निळवंडे 79 टक्‍के भरले आहे. त्यात जायकवाडी धरण अद्याप 41 टक्‍के भरले असल्याने समन्यायी पाणी वाटप कायदामुळे जायकवाडीला नगर जिल्ह्यातील धरणामधून पाणी सोडण्याची शक्‍यता आता निर्माण झाली आहे. जायकवाडी 65 टक्‍के भरले असते तर हे संकट ओढावले गेले नसते. परंतू आता जायकवाडीत जिल्ह्यातील पाणी झेपावण्याची शक्‍यता आहे. जर जायकवाडीला पाणी सोडले तर नगर जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी सोडणे अवघड होणार आहे. गेल्यावर्षी सहा आवर्तन सोडली होती. परंतू यंदा रब्बीसाठी एकच आवर्तन सोडले जाण्याची शक्‍यता आहे.

नगर – सरासरीच्या 119 टक्‍के क्षेत्रावर पेरणीपैकी निम्म्याहून अधिक खरीप वाया गेल्यात जमा असताना परतीच्या पावसानेही गुंगारा मारल्याने दरवर्षी 15 सप्टेंबरपासून सुरू होणारी रब्बी पेरणी यंदा सुरुच झाली नसल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. ज्या भागात गेल्या आठवड्यात झालेल्या तुरळक पावसावर 500 हेक्‍टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. पावसाने तब्बल अडीच महिने ओढ दिल्याने खरीपाच्या उत्पादनात तब्बल 60 टक्‍के घट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

-Ads-

अत्यल्प पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील विविध पिकांना त्याचा फटका बसला आहे. तसा अहवालही कृषी खात्याने वरिष्ठांना दिला आहे. जिल्ह्याचे खरीप पेरणीचे उद्दिष्ट 5 लाख 99 हजार 815 हेक्‍टर असताना सात लाख 15 हजार 386 हेक्‍टरवर पेरणी झाली असल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या; मात्र नंतर पाऊस गायब झाल्याने संपूर्ण खरीप पेर वाया गेली आहे. पाऊस नसल्याने खरिपाशिवाय ऊस, कांद्यासह अन्य पिकांवरही परिणाम झाला आहे. नगर जिल्हा हा रब्बी असल्याने रब्बीचे क्षेत्र साडेसहा लाख हेक्‍टरपर्यंत आहे; मात्र यावर्षी पावसाळ्यात व परतीचा पाऊसही नसल्याने रब्बी पेरणीला सुरुवातही झाली नाही.

जिल्ह्यात साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्‍टोबर या कालावधीत ज्वारीची पेरणी केली जाते. पावसाच्या प्रमाणावर पेरणीचा कालावधी काही अंशी बदलतो; मात्र यावर्षी पाऊसच नसल्याने ज्वारीच्या पेरणीला सुरुवातही झाली नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातून सांगण्यात आले. पारनेर, जामखेड, कर्जत, नगर या तालुक्‍यात सप्टेंबर महिन्यातच ज्वारीची पेरणी केली जाते. गेल्या आठवड्यात काही भागात तुरळक पाऊस झाल्याने त्यात भागात ज्वारीची पेरणी झाली आहे. परंतू ते प्रमाण कमी आहे. पावसामुळे चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात 65 हजार 411 हेक्‍टर क्षेत्रावर चाऱ्याची पेरणी झाली आहे. परंतू पावसाअभावी हे पेरणी धोक्‍या आली आहे.

जिल्ह्यात पाऊस 69 टक्‍क्‍यापर्यंत

दमदार पावसाची नक्षत्रे निघून गेली असून आतापर्यंत 69.32 टक्‍के पाऊस पडला आहे. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यात 6 हजार 963 मि. मी. तर सरासरी 497.4 मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते. या कालावधीत प्रत्यक्षात 4826 मि.मी. व सरासरी 344.75 मि.मी. पाऊस पडला आहे. जुन महिन्याचा पाऊस सोडला तर जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाचे पाठ फिरवली.

ऊस लागवडीवरही परिणाम

जिल्ह्यात जुलै ते ऑक्‍टोबर या कालावधीत ऊस लागवडीची लगबग सुरू असते; मात्र यावर्षी पाऊस नसल्याने नवीन ऊस लागवडीवर परिणाम झाला आहे. धरणालगत काही भागात उसाची नव्याने लागवड झाली असल्याचे सांगण्यात आले; मात्र जिल्ह्याच्या इतर भागात सध्या असलेल्या उसाची वाढही चांगली झाली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)