बोंडअळी, हुमणीच्या संकटाने शेतकरी उद्‌ध्वस्त

File photo

राहुरी तालुक्‍यातील कपाशी, उसाच्या उत्पन्नात होणार कमालीची घट : साखर कारखानदारही चिंतेत

राहुरी – कपाशीवरील बोंडअळी, उसावरील हुमणी अळीने राहुरी तालुक्‍यातील शेतकरी उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने हा प्रादूर्भाव वाढत आहे. त्याचा परिणाम थेट उत्पन्न घटण्यातच होणार असून यंदा कपाशी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा तोटा सहन करावा लागणार आहे. लवकरात लवकर पाऊस झाला, तरच अळी निर्मूलनास मदत होईल, असे शेतीतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यंदा तालुक्‍यात ऊस आणि कपाशीची मोठ्या क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्यातील कपाशीला बोंडअळीसह इतर रोगांनी घेरले आहेच. त्यातून बाहेर पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांना उसावरील हमुणी अळीच्या चिंतेने ग्रासले आहे. तालुक्‍यातील बहुतांश भागातील उसावर हुमणी अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. हुमणी अळीमुळे ऊस जागेवरच जळून चालला आहे. या रोगकिडीचा सामना करण्यासाठी प्रसाद शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ऊस तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकाऱ्यांसमवेत शेतकऱ्यांचे चर्चासत्र आयोजित केले होते.

रोगकिडींचा बंदोबस्त करण्यासाठीच्या उपाययोजनांचा उहापोह यावेळी केला गेला होता. यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी सर्वचस्तरावर मेळावे घेण्याची गरज आहे. तसा प्रयत्न कृषी विभाग, कृषी विद्यापीठाकडूनही होणे आवश्‍यक आहे.

तालुक्‍यात मागील वर्षाच्या तुलनेत उसाचे क्षेत्र घटल्याची स्थिती आहे. यंदा आडसाली 1 हजार 868, सुरू 2 हजार 867, पूर्वहंगामी 4 हजार 351 तर खोडवा 6 हजार असे एकंदर 15 हजार हेक्‍टर क्षेत्रावर ऊस लागवड आहे. डॉ. तनपुरे कारखाना व प्रसाद शुगर या दोन कारखान्यांबरोबरच जिल्ह्यातील विखे, संगमनेर, संजीवनी, अशोकसह 5-6 कारखान्यांचे भवितव्य येथील उसावर अवलंबून असते. येथील उसाच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यातील कारखान्यांचे गळीत ठरविले जाते. मात्र यंदा हुमणीच्या प्रादूर्भावाने कारखान्यांचे गळीताचे गणित कोलमडणार आहे.

“या हुमणी अळींचा बंदोबस्त करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने नियंत्रण शक्‍य आहे. तसेच किटकनाशकांचा योग्यवेळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर. त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य सांभाळून लिंबोळी अर्क, प्रकाश सापळ्यांचा वापर केल्याने हुमणी अळीचा बंदोबस्त करणे शक्‍य होणार आहे.
-महेंद्र ठोकळे ,तालुका कृषी अधिकारी, राहुरी

सध्याच्या पाहणीनुसार खोडवा उसावर या अळीचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव झाला आहे. अळीच्या प्रादूर्भावाने उभे पीक करपून जाते. सध्या ज्या भागात असा प्रकार अढळून येत आहे, तेथील शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी मिळेल त्या किमतीत ऊस विक्री करीत आहेत. कपाशीवर गुलाबी बोंडअळी आल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. तसे हे संकट निसर्ग व मानवनिर्मित म्हणावे लागेल. बाजारात बीटी कपाशी बियाणे आले. त्यावेळी कपाशीवर बोंडअळी येणारच नाही असे बोलले जात होते. मात्र नानबीटीमुळे बोंडअळी येते असा समज आहे. किटकांचे किडीचे नियंत्रण जवळपास 90 टक्‍के निसर्गच करतो. त्यासाठी वेळेवर पाऊस होणे गरजेचे असल्याचे मत शास्त्रज्ञ व्यक्‍त करीत आहेत. पावसाचा ऐन पावसाळ्यात साधारण दीड-दोन महिने खंड पडल्याने या अळीचा प्रादुर्भाव वाढला.

सलग पाऊस पडायला हवा…

हुमणी अळी चार संक्रमण अवस्थेतून तयार होत असते. ती जमिनीतच तयार होत असल्याने लवकर दिसून येत नाही. पिके करपायला लागल्यानंतर अळीचा प्रादूर्भाव लक्षात येतो. मे, जून महिन्यात ही अळी सुप्तावस्थेत असते. पाऊस पडल्यानंतर ती बाहेर येते. मात्र सलग पावसात ती नामशेष होते. कोणतीही किटकनाशके वापरली तरी ही किड आटोक्‍यात येत नाही. मात्र किटकनाशकाने या अळीचा प्रादूर्भाव कमी करता येतो, असे शेतीतज्ज्ञांचे मत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)