राहात्यातील वाळूचोरापुढे पोलीस हाताश !

स्थानबध्दतेच्या कारवाईतील कुख्यात वाळूचोर दीड महिन्यापासून पोसिलांना सापडेना; जिल्हा प्रशासन व मंत्रालयाच्या आदेशाला केराची टोपली

प्रदीप पेंढारे

कुख्यात वाळूचोर न सापडणे हा अजूबाच!

विक्रांत नवले ऊर्फ बबलू याच्यावर दीड महिन्यापूर्वी कारवाई झाली होती. मोहरम आणि गणेशोत्सवाच्या काळातही हा कुख्यात वाळूचोर पोलिसांना सापडला नाही. या उत्सवाच्या काळात शहरासह जिल्ह्यातील सुमारे 550 जणांविरोधात तडीपार, प्रतिबंधात्मक आदी कारवाई केल्या होत्या. याच दरम्यान कुख्यात दरोरडेखोर पपड्या याने कोपरगावात दरोडा घातला होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली. हे दोन्ही उत्सव जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखून पार पडले म्हणून जिल्हा पोलीस दलाचा जिल्हाधिकारी कार्यालयात गाजावाज करत सत्कार झाला. परंतु उत्सवाच्या अगोदरपासून ज्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे, तो मात्र पोलिसांनी अजूनही सापडला नाही, हा नववा अजूबाच म्हणावा लागेल.

-Ads-

नगर  – राहाता तालुक्‍यातील पुणतांबा येथील कुख्यात वाळूचोर विक्रांत नवले ऊर्फ बबलू याच्यावर जिल्हा प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली होती. या कारवाईची अंमलबजावणी जिल्हा पोलीस दलाकडून अजूनही झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनीही हा कुख्यात वाळूचोर सापडत नसल्याची हताश प्रतिक्रिया देत या माहितीला दुजोरा दिला आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि त्यांच्या महसूल अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील वाळू चोरांविरोधात एल्गार पुकारला आहे. यातून वाळूचोरांनी देखील महसूल अधिकाऱ्यांना टार्गेट केले आहे. त्यांच्यावर हल्ले करत आहेत. कट कारस्थान आखून बदनामी करत आहेत. या कारस्थांना वाळूचोर कृतीची जोड देत आहेत. वाळूचोरांना मिळणारे हे बळ कायदा-सुव्यवस्थेच्या दिशेने चितांजनक, असेच आहे. वाळू चोऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी कायद्याचे मोठे हत्यार पोलिसांकडे आहे. तरी देखील त्याचा प्रभावी वापर होताना दिसत नाही. राहातामधील या प्रकरणामुळे त्यावर शिक्कामोर्तबच झाला आहे.

पोलीस दलाच्या या कृतीवर जिल्हाधिकारी यांच्यासह महसूल प्रशासनाची छुपी नाराजी आहे. त्याचे पडसाद भविष्यात महसूल आणि पोलीस दलात सुरू असलेल्या शीतयुद्धात आणखीच उमटणार असल्याचे दिसते आहे. महसूलच्या अनेक आदेशाला जिल्हा पोलीस दलाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. यावरून या शीतयुद्धाचा भडका लवकरच उडेल, अशी काही जाणकरांनी शंका व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुणतांबा येथील कुख्यात वाळूचोर विक्रांत नवले ऊर्फ बबलू याच्याविरोधात एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेच्या कारवाईचा आदेश 13 ऑगस्टला काढला होता. जिल्हा पोलीस दलाला या कारवाईची अंमलबजावणीची सूचना केली होती. जिल्हा पोलीस कार्यालयातमार्फत या आदेशाची अंमलबाजवणी राहाता पोलिसांना करायची होती. एमपीडीए कायद्यातील तरतुदींनुसार कुख्यात वाळूचोर विक्रांत नवले ऊर्फ बबलू याच्याविरोधात पोलिसांनी तत्काळ म्हणजे 24 तासाच्या आत कारवाई करणे अपेक्षित होते. या कायद्यानुसार त्याला अटक करून स्थानबद्ध करणे आवश्‍यक ठरते. पोलिसांना यात अपयश आले.

विक्रांत नवले पोलिसांना सापडला नाही. पोलिसांनी या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी हा आदेश त्याच्या नातेवाइकाकडे दिल्याचे समोर येत आहे. यावर नातेवाइकांनी या आदेशाविरोधात मंत्रालयात अपिल केले. या अपिलच्या काळात देखील पोलिसांना विक्रांत नवले सापडला नाही. एमपीडीए कायद्यातील तरतुदींनुसार अपिल करताना संबंधित आरोपीला पोलिसांनी पहिले अटक केली पाहिजे. त्यानंतर आरोपीला मंत्रालयाकडे अपिल करता येते. तथापि, येथे असे झाले नाही. येथेही कायदा-नियम धाब्यावर बसविले गेले. पोलिसांची याची साधी विचारणा देखील केली नाही.

पोलिसांना गुंगारा देत विक्रांत नवले याने मंत्रालयात अपिल केले. या अपिलाची प्रक्रिया आणि कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणीची पद्धतही मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले नाही, हे विशेष! मंत्रालयाने देखील अपिलावर सुनावणी घेत ते फेटाळून लावले. पोलिसांच्या नाकाखाली टिच्चून विक्रांत नवले याने मंत्रालयात केलेले हे अपिल जिल्ह्यातील वाळू चोरांमध्ये खुमासदार चर्चेचा विषय बनला आहे. मंत्रालयाने त्याचे अपिल 6 सप्टेंबरला फेटाळले. यानंतरही पोलिसांना या कुख्यात वाळूचोराला अटक करण्यात यश आले नाही. या अपयशामागची कारणे वेगळी असल्याची चर्चा रंगली आहे. एका वाळू चोराने जिल्हा पोलिसांना हाताश गेले आहे, हे मात्र खरे.

विक्रांत नवले ऊर्फ बबलू या वाळू चोराविरोधात स्थानबद्धतेच्या कारवाईचा आदेश आहे. आदेश निघाल्यापासून तो पसार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. स्थानबद्धतेच्या आदेशाविरोधात बबलू याने अपिल केले आहे. मंत्रालयातील त्याचे अपिल फेटाळले आहे. त्यावर त्याने न्यायालयात अपिल केले आहे. तीन तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे.
– रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)