परीक्षा तोंडावर; प्राध्यापक संपावर

11 दिवसांपासून कॉलेज बंद; महाविद्यालयांचे अभ्यासक्रम अपूर्ण

जिल्ह्यात एक हजार प्राध्यापकांचा सहभाग

या आंदोलनात पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 55 महाविद्यालयांतील 1 हजार प्राध्यापक सहभागी आहेत. प्राध्यापकांच्या संपाला विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिल्याने आता त्यांची व्यापी वाढत आहे. विद्यार्थी देखील आंदोलनस्थळी बसत आहेत.

नगर  – गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयातील शिकविणे बंद झाले आहे. 18 दिवसांवर परीक्षा आली असून, अजूनही कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील सरासरी 20 टक्‍के अभ्यासक्रम अपूर्ण आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन राज्य शासनाने या आंदोलनाबाबत लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्‍यक आहे.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी संघटनेचे शिष्टमंडळ आणि उच्च शिक्षणमंत्री यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलनाची तीव्रता वाढविली. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्राध्यापकांची संख्या वाढत आहे. बहुतांश महाविद्यालयांतील कायमस्वरूपी प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाल्याने तेथील तास होत नाहीत. एकंदरीतपणे या महाविद्यालयांतील शिकविणे बंद झाले आहे. 15 जुलैपासून पदवी अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू झाली. त्यानंतर कामबंद आंदोलन सुरू होईपर्यंत विविध विषयांचा पहिल्या सत्रातील सरासरी 80 टक्‍के अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठाकडून कला आणि वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यातच अजून 20 टक्‍के अभ्यासक्रम शिकविणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)