विखेंना भाजपमध्ये जाण्याचा कार्यकर्त्यांकडून आग्रह

-कार्यकर्त्यांच्या बैठकीत “जय श्रीराम”चा जयघोष
– विखे हा पक्ष दाखवू द्या, 1999 ची पुनरावृत्ती करा

राहाता – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडण्यास तयार नसेल तर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह आज विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या समर्थकांनी धरला. ‘जय श्रीराम’च्या घोषणा देते, राजकीय अन्याय होत असेल, तर सरळ भाजपची वाट धरा, अन्याय करणाऱ्यांना सोडचिठ्ठी देत, 1999 ची पुनरावृत्ती करा, विखे हाच पक्ष आहे. हे पुन्हा दाखवून द्या, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी जाहीरपणे केली. त्यामुळे जिलह्यात लवकरच राजकीय उलथापालथ होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

शिर्डी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची प्रवरानगर येथील डॉ.धनंजय गाडगीळ सभागृहात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे होते. या बैठकीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र भाजपमध्ये जायचे की अपक्ष लढायचे याबाबत कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली. ऍड.रघुनाथ बोठे, कैलास कोते, अभय शेळके, डॉ.भास्कर खर्डे, शांतीनाथ आहेर, राजेंद्र कुंकुलोळ, रावसाहेब साबळे आदींनी आपले मत व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बहुतांशी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याची भूमिका मांडली. राष्ट्रवादीने त्यांचा उमेदवार निश्‍चित केल्याने आता जागा मिळण्याची शक्‍यता राहिली नाही. जरी ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली तर या पक्षाला भविष्यकाळ नसल्याने व त्याची राजकीय टाकत मर्यादित असल्याने आपल्याला फायदा होणार नाही.मात्र भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून त्यात मोठी संधी मिळू शकते. पक्षाची मते असल्याने निवडणूक सहज जिंकता येईल. देशातील एकूण परिस्थिती बघता भाजपला पुन्हा सत्ता मिळू शकते, असे वातावरण दिसत असल्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी अनेक वक्त्‌यांनी केली. राहुल गांधींचे नेतृत्व देश चालवण्यास सक्षम नसल्याचे मतंही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

ना.विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्यानंतर मार्गदर्शन करताना म्हणाले, निष्ठावान कार्यकर्ते ही आपली खरी ताकद आहे. कै. बाळासाहेब विखे यांनी अनेकदा महत्वाचे राजकीय निर्णय घेताना कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेतले. भाजपत जाण्याचा अथवा नगरमधून अपक्ष लढण्याचा निर्णय त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवूनच घेतला आहे. राष्ट्रवादीने जागा सोडावी म्हणून आपण भरपूर प्रयत्न केले. नगरमधून डॉ. सुजय विखे निवडणूक लढणार हा निर्णय सर्वांच्या भावना ऐकल्यानंतर आपण या बैठकीत घेत आहोत.

अपक्ष लढायचे की भाजपमध्ये जायचे याचा निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक कार्यकर्त्याने दक्षिण नगरमध्ये जाऊन नातेवाईक, मित्रपरिवार आणि संबंधित लोकांकडे जाणून लोकभावना जाणून घ्यायची आहे. 1 मार्च पासून सर्वांनी ही जबाबदारी घेवून अभिप्राय द्यावा. त्यानंतर योग्य निर्णय आपण करू असे ना. विखे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. या बैठकीला दीड हजार कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनीही काही काळ या बैठकीस हजेरी लावली. डॉ. सुजय विखे पाटील मात्र या बैठकीस उपस्थित नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)