सत्ताधारी शिवसेनेला,आमदारांना विकासाचे देणे घेणे नाही

खा.दिलीप गांधी : भिस्तबाग चौकात भारतीय जनता पक्षाची भव्य जाहिर सभा

नगर – सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहोरात्र काम करत आहेत. विकासाच्या नवनवीन कल्पना राबवून विकास योजना थेट जनतेपर्यंत पोहचवत आहेत. नगरलाही ही विकासाची गंगा येत आहे. केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून नगर शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भरिव निधी दिला आहे. मात्र महानगरपालिकेच्या माध्यमातून या मंजूर विकास कामांची 100 टक्के अंमलबजावणी होत नाही.

सत्ताधारी या विकास कामांमध्ये खोडा घालत आहेत. विकास कामांचे श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळेल हे त्यांना खुपते आहे. म्हणूनच 10 कोटींच्या कामातही त्यांनी अडथळा आणून निधी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास यश आले नाही. लवकरच या 10 कोटींची विकास कामे शहरात सुरु होणार आहेत. असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका आशा कराळे, पै.शिवाजी कराळे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भारतीय जनता पार्टीमध्ये खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. यानिमित्त भिस्तबाग चौकात आयोजित भव्य जाहीर सभेत खा.गांधी बोलत होते. या जाहीरसभेमुळे संपूर्ण भिस्तबाग चौक भाजपमय झाला होता. सावेडी उपनगर परिसरातील हजारो नागरिक, महिला, युवक या सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी भाजपाचे शहर उपाध्यक्ष किशोर डागवाले, मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, सभापती बाबासाहेब वाकळे, सरचिटणीस किशोर बोरा, करण कराळे, तायगा शिंदे आदिंसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलतांना खा. दिलीप गांधी म्हणाले, उपनगर भागातही मोठ्या प्रमाणात विकास कामे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत, त्यामुळे भविष्यात नगर शहरात विकासाचे वारे वाहणार आहेत. नगर शहर पुणे, औरंगाबाद शहरांच्याही पुढे न्यायचे आहे, यासाठी केवळ रस्ते, लाईट, पाणी व इतर सुविधा देऊन चालणार नाही तर प्रत्येक नागरिकाचा विकास करायचा आहे. यासाठी महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता भाजपाच्या हातात द्या. नगरवासियांनी याआधी भाजप व्यतिरिक्त सर्वांना महापौर पदाची संधी दिली आहे. एकवेळ आमच्या हातात सत्ता द्या, शहराचे चित्र नक्कीच बदलेल. उपनगरमधील आशा कराळे, शिवाजी कराळे सारखे चांगल्या कुटूंबातील नेते भारतीय जनता पार्टीत आल्याने भाजपाची उपनगरात नक्कीच ताकद वाढणार आहे.

याप्रसंगी सुवेंद्र गांधी म्हणाले, वर्षानुवर्षे उपनगराने शिवसेनेला मतदान केले. आमदार, नगरसेवक निवडून दिले मात्र सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने सावेडी उपनगराकरीता काय केले. याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. युवकांसाठी व्यायामशाळा नाही, वेळो अवेळी पाणी, सर्वत्र अस्वच्छता, सुविधांचा अभाव असे चित्र शहराचे व उपनगराचे झाले आहे. परिवहन खाते शिवसेनेकडे असूनही नगर शहरातील बससेवा या सत्ताधारी शिवसेनेने बंद पाडून उपनगरमधील नागरिकांना वेठेस धरले आहे. लाज वाटली पाहिजे या सत्ताधाऱ्यांना!

आशा कराळे म्हणाल्या, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी विकास गंगा आणली आहे, त्यांच्या कामाने प्रभावीत होऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचे निश्‍चित केले. भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांना न्याय व मान देणारा पक्ष आहे.

शिवसेनेचा डाव हाणून पाडला

प्रोफेसर कॉलनी चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्‍स पाडून कोट्यावधी रुपयांची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव शिवसेनेचा होता मात्र तो आम्ही हाणून पाडला आहे. शहराच्या विकासाच्या गप्पा मारणा-या आमदारांच्या सारसनगर भागातील नागरिक गेले 15 वर्षे पाण्याच्या टॅंकरवर उपजिविका करत होते. पाईपलाईन, पाण्याची टाकीचे काम पूर्ण झाले असूनही केवळ कार्यकर्त्यांचे हात ओले करण्यासाठी पाणी पुरवठा सुरु केला नाही. मात्र ज्यावेळी मनपाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करताच टप्प्याटप्प्याने हा पाणी पुरवठा सुरु झाला आहे. सत्ताधारी शिवसेनेला व आमदारांना नगरच्या विकासाचे काहीही देणे घेणे नाही, केवळ मला काय व श्रेया करीताच त्यांचा खटाटोप सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)