भाजपची भिस्त आयाराम गयारामांवर

जुन्या निष्ठावंतांना ठेवले खड्यासारखे बाजूला; खा. गांधींची एकाधिकारशाही सुरू

नगर – डिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत शतप्रतिशत सत्ता आणण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. पक्षाच्या वरिष्ठपातळीवरून देखील त्या दृष्टीने व्युहरचना आखण्यात येत आहे. परंतू सत्तेचा सोपान चढविण्यासाठी भाजपची भिस्त आयाराम-गयारामवर असल्याचे दिसत आहे. अन्य पक्षातील विद्यमान नगरसेवकांसह बड्या कार्यकर्त्यांना गळ्याला लावून त्यांना भाजपवासी करण्याचा खटाटोप होत असतांना दुसरीकडे मात्र पक्षातील जुन्या निष्ठावंतांना खड्यासारखे बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे ही मंडळी सध्या कोठेच निवडणूक प्रक्रियेत दिसत नसल्याने शहरजिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांची एकाधिकारशाहीच सुरू झाली आहे. परिणामी जुने नेते व कार्यकर्ते सध्या तरी खा. गांधींची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असल्याने त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार पक्षीयपातळीवर झाला आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत पक्षाकडून केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात सांगली व जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश पाहता नगरमध्ये देखील भाजपची सत्ता येवू शकते. या भ्रमात स्थानिक नेतृत्व काम करीत आहे. पक्षाची ताकद ज्या ठिकाणी कमी अथवा काहीच नाही अशा ठिकाणी अन्य पक्षातील नगरसेवक व मोठे कार्यकर्ते गळाला लावून त्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी खा. गांधी प्रयत्नशिल आहे. त्यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी व नगरसेवक किशोर डागवाले यांच्यावर नगरसेवक व कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणण्याची जबाबदारी दिली आहे. हे दोघे सध्या तीच मोहिम राबवित आहे.

सत्तेसाठी जादुई 35 आकडा गाठण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण भाजपने सुरू केले आहे. भाजपमध्ये सध्या तरी महापालिका निवडणुकीसाठी काय तो निर्णय खा. गांधी घेत आहे. खा. गांधी यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या बेरजेच्या राजकारणामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची वजाबाकी होत आहे. ते कार्यकर्ते दुरच डोंगर साजरे अशा पद्धतीने वागत आहे. खा. गांधी एकीकडे मातब्बरांना भाजपवासी करीत आहे. तर दुसरीकडे भाजपमधील नेते लांब जात आहे. अर्थात त्यांना विश्‍वासात न घेताच खा. गांधी यांनी एक हाती कार्यक्रम सुरू केला आहे. खा. गांधी यांच्याकडून जुन्या व नव्याचा मेळ घातला जात नसल्याने जुने निष्ठावंत महापालिका निवडणूक प्रक्रियेत दिसत नाही.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गटबाजी बाजूला ठेवून महापालिका निवडणुकीत काम करण्याचे आदेश दिले आहे. तरी सध्या ऍड. अभय आगरकर गट बाजूला आहे. त्यात आगरकर गटातील नगरसेवक दत्ता कावरे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशा पद्धतीने पक्षातील जुने कार्यकर्ते व नेते आता पक्षांतराच्या प्रयत्नात आहे. त्याचा फायदा शिवसेनेने घेण्यास सुरूवात केली आहे. काहींना त्या दृष्टीने शिवसेनेच्या नेत्यांबरोबर संपर्क देखील साधला आहे. त्यामुळे भाजपची ताकद एकीकडे कमी होत असल्याचे चित्र आहे.

खा.गांधी यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात कार्यकर्ते बोलू लागले असून पक्षाचे माजी शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लेखी पत्र पाठवून त्यांचे लक्ष वेधले आहे. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असून त्यांना विश्‍वासात न घेताच अन्य पक्षातील नगरसेवक व कार्यकर्त्यांना प्रवेश दिली जात आहे. जुन्यांना या निवडणुकीत संधी देण्यात यावी अशी मागणी गट्टाणी यांनी केली आहे. खा. गांधी यांनी जुन्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही तर भाजपला या निवडणुकीत त्यांचा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

निष्ठावंतांची खलबते सुरू

खा. गांधी यांच्याकडून जुन्या निष्ठावंतांना बाजूला करण्यात आल्याने आता या निष्ठावंतांना एकत्रित मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी दबाव गट तयार करण्याचा त्याचा प्रयत्न असून त्या दृष्टीने या निष्ठावंतांच्या बैठका होत आहे. नुकतीच एक बैठक एका कार्यकर्त्यांच्या घरी झाली असून त्यात बैठकीत उमेदवारीसाठी दावा करण्याचा ठरले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर काय तो निर्णय घेण्याचे ठरले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)