खा. गांधी की विखे; कोणाचा मार्ग झाला मोकळा ?

कर्डिलेंच्या व्यूरचनेमुळे दक्षिण वेगळ्याच वळणावर : मुंडेंचा इशारा कोणाच्या पथ्यावर

-बाबासाहेब गर्जे

पाथर्डी – ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या पाथर्डी (राहुरी मतदारसंघ) दौऱ्यात अपेक्षा होती, ती झालेल्या आरोपांवरील प्रत्योत्तराची पण रंगले नाट्य लोकसभेच्या महामार्गाचे. आ. शिवाजीराव कर्डिले यांनी भाजपला सोडणार नसल्याचे स्पष्ट करून खा. दिलीप गांधी याचा मार्ग मोकळा केल्याचे सुचक वक्‍तव्या त्यांनी केले खरे परंतु प्रत्यक्षात रंगमंचावरील असलेले कलाकाराची भूमिका वेगळेच संकेत देवून जात आहेत. त्यामुळे लोकसभेचा मार्ग खा. गांधी की विखे यापैकी कोणासाठी मोकळा होणार हे आता पाहण्याची गरज आहे.

राहुरी मतदारसंघात विखेंना मानणारा मोठा वर्ग आहे.हे कुणीही अमान्य करणार नाही. आ.कर्डिलेंना हे ज्ञात नसावे तर नवल. विखे- कर्डिले यांचे स्नेहाचे संबंध जिल्ह्याला सर्वश्रुत आहेत. ना.मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याच्या स्थळी विखे समर्थक जाणिवपूर्वक उपस्थित होते. मतदारसंघातील राजकीय वातावरण लक्षात घेऊन आ. कर्डिलेंनी व्यासपीठ अत्यंत खुबीने हाताळले.

आ. कर्डिले यांच्या व्युहरचनेनुसार विखे समर्थक ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांनाच थेट ना. मुंडे समोर बोलण्याची संधी देण्यात आली. अर्थात राहुरी तालुक्‍यात पाटील यांचे भाषणे योग्य होते. पण पाथर्डी तालुक्‍यातील दोन गटापुरता विचार करता तेथील नेत्याला बोलू देणे योग्य. पण जाणिवपूर्व सुभाष पाटील यांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यातून पाटील यांनी भाषणात विखेंचे सुदर्शन चक्रच जिल्ह्यात कसे चालते हे पटवून दिले. एवढेच नव्हे तर विखे यांचेच जिल्ह्यावर वर्चस्व असल्याचे स्पष्ट केले.

ना.मुंडे यांच्यासमोर विखे पुराण गाऊन लोकसभेसाठी विखेंच कसे योग्य उमेदवार असल्याची दुसरी बाजू देखील या निमित्ताने सुभाष पाटील यांच्या माध्यमातून आ. कर्डिले यांनी आणली असल्याचे या रंगमंचावरील कलाकरांच्या भूमिकेवर वरवर दिसत आहे.अर्थात जाणकरांमध्ये देखील ही सभा केवळ डॉ.सुजय विखे यांच्यासाठी भाजपचे बंद असलेले दरवाजे खिळखीने करण्याचे नियोजन असल्याचे बोलले जाते. अत्यंत नेटके नियोजन असलेल्या कार्यक्रमात आ.कर्डिले यांच्या हुशारीची चुणूक पुन्हा पहावयास मिळाली.

आ.कर्डिले यांनी भाजप सोडणार नसल्याच्या स्पष्टीकरणानंतर खा.गांधी यांचा लोकसभेचा मार्ग मोकळा झाल्याचे खुद्द आ.कर्डिलेंसह अनेक वक्‍त्यांनी स्पष्ट केले. आ.कर्डिलेंच्या राजकीय मुरब्बी धोरणाचा जिल्ह्यात अनेकांना अनुभव आहे. त्यांच्या खा.गांधी यांच्या सुकर मार्गाच्या वक्‍तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले तर फार नवल नाही. माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी आ.कर्डिले तेल लावलेले पहिलवान आहेत. ते कोणाच्या हाताला लागणार नाहीत. विखेंनाही कधी सोडतील, हे कळणार नाही, अशी विनोदाने टिप्पणी करत काहीशी साशंकता व्यक्‍त करून राजकीय अभ्यासू वृत्ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर सावध पवित्रा घेत खा.गांधी यांचे अभिनंदन केले.

ना. मुंडे यांनी मात्र या विषयावर थोडक्‍यात पण सूचक टिप्पणी केली. त्या म्हणाल्या, गांधी यांचा मार्ग मोकळा झाला किंवा नाही, यावर टिप्पणी करणार नाही असे सांगून आगामी राजकीय उलथापालथी विषयीची गूढता अधिक वाढविले. त्यात बीड जिल्ह्याप्रमाणे नगर जिल्हाही बालेकिल्ला करणार असल्याचा एल्गार देऊन जिल्ह्यात राजकीय भूकंप करणार असल्याचे जणू संकेतच दिले. अर्थात सहकाराचे साम्राज्य असलेल्या नगर जिल्हा मुंडेमय करण्यासाठी कोण साखर सम्राट गळाला लागणार हे अधिक महत्वाचे आहे.

या सर्व घडामोडीतून आगामी लोकसभेसाठी खा. गांधी- विखे पैकी नेमका मार्ग सुकर कोणाला? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. विखे परिवाराचा व्यासपीठावर झालेला उदो उदो, व्यासपीठावर गरज नसताना उघड करण्यात आलेली गुपिते. या सर्वांतून गांधींचा मार्ग मोकळा झाला, असे म्हणणे राजकीय विश्‍लेषकांना फारशी रुचत नाही.या सर्व घडामोडीतून वेगवेगळे संदर्भ जोडले जात आहेत.

2019 च्या विधानसभेनंतर ना. मुंडे यांची मुख्यमंत्रीपदासाठीची तयारी म्हणूनही या दौऱ्याकडे व घडामोडीकडे पाहिले जात आहे. आ. कर्डिले यांनी अमित पालवे यांच्यावर नगर जिल्ह्याची जबाबदारी सोपवावी व मुंडे यांनी राज्य सांभाळावे, अशा टिप्पणीने सभास्थळी हास्यकल्लोळ उडाला असला तरी कुठलीही गोष्ट साधे सरळ व्यक्‍त करतील तर ते आ. कर्डिले कसले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)