नगर – लोकसभा, विधानसभेसाठी दोन्ही कॉंग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी की स्वबळावर याचा निर्णय स्थानिकपातळीवर घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार महापालिका निवडणुकीचा निर्णय हा स्थानिकपातळीवर होईल. त्यासाठी शहरजिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती आघाडी की स्वबळाचा काय तो अहवाल प्रदेशकडे देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पक्ष निरिक्षक अकुंश काकडे यांनी दिली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसवतीने पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यानंतर काकडे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महापालिका निवडणूक स्वबळावर की आघाडी याबाबत पक्षात एकमत नाही. काहींच्या मते आघाडी करावी तर काहींना स्वबळावर निवडणूक लढल्यास राष्ट्रवादीची सत्ता येईल असे वाटते. गेल्या निवडणुकीत आघाडी होती. तेव्हा राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. आता आव्हानात्मक निवडणूक आहे. आघाडीचा निर्णय स्थानिकपातळीवर करण्यात येणार असला तरी महापालिका निवडणूक आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे.

आघाडी की स्वबळ याचा निर्णय घेण्यासाठी विधाते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीमध्ये आ. जगताप, आ. अरूण जगताप, दादा कळमकर आदी नेते असतील. ते काय तो निर्णय घेवून प्रदेशकडे अहवाल देतील. स्थानिकपातळीवर घेतलेल्या निर्णयाला मान्यता देण्यात येईल, असे काकडे म्हणाले.

चार महिन्यापूर्वी केडगाव येथे झालेली घटना दुदैवीच होती. पण त्याबाबत पक्षाकडून जाहिरपणे कोणीच काही बोलणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होणार नाही. अर्थात काहींनी खालच्यापातळीवर जावून राजकारण केले. त्याचा परिणाम सर्व नगरकरांना भोगावे लागले. नगरची प्रतिमा मलिन झाली. शहराची राज्यात बदनामी झाली. त्याचे दुःख पक्षाला आहे. पण त्या घटनेचा व त्यानंतर झालेल्या प्रकरणाचा पक्ष फायदा घेण्याचा प्रयत्न करणार नाही. याबाबत काय ते जाहिर बोलण्याचा अधिकारी आ. संग्राम जगताप यांना देण्यात आला असून अन्य कोणीही त्यावर बोलणार नसल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)