कविता : नेत्यांना जनतेची वाटायला हवी भीती

बहुतांश मोठे राजकारणी
अल्पभूधारक आहेत कागदोपत्री
तरीही सीबीआयच्या भीतीने
ते दचकून उठतात रात्रीअपरात्री

बेहिशेबी बेनामी संपत्तीमुळेच
बिचारे रात्ररात्र असतात जागे
मरेपर्यंत अशांना धाकच असतो
चौकशीचे शुक्‍लकाष्ठ लागेल मागे

अनेक राज्यांत अन्‌ महानगरांत
पुढाऱ्यांनी प्रॉपर्टी जमविलेली
भानगडी करूनच होतात मोठे
नाहीच कष्ट करून कमविलेली

फुकाची कमाई उधळायला
नेत्यांना वाटतच नाही काही
हवेत चालणारे काही पुढारी
कधी जमिनीवर चालतच नाही

नेत्यांच्या स्वीय सहायकांचीही
भेट मिळतच नसते लवकर
राजकारण्यांच्या भोवताली
सहकारातीलच नोकरचाकर

सत्तेचा गैरवापर केल्यानेच
पुढारी झालेत फारच गबर
कुणी कितीही टीका केली तरी
भानगडबाजांची कातडी निबर

आचारसंहिता असली तरी
भ्रष्ट नेत्यांना फरक नाही पडत
आचारसंहिता भंग केली म्हणून
नेते गजाआड असे नाही घडत

जनतेच्या माना मुरगळून
अनेक राजकारणी झालेत मोठे
कुणी त्यांच्यावर आरोप केलेच तर
म्हणतात आरोप पूर्णपणे खोटे

समाजाचा विश्‍वासघात करणे
नेत्यांना फारच चांगले जमते
सत्तेच्या आसपास असल्यावरच
सत्तांध पुढाऱ्यांचे मन रमते

तमाम राजकीय नेत्यांना
जनतेची वाटायला हवी भीती
स्वच्छ प्रामाणिक नेत्यांनाच संधी
हीच भारतीयांची असावी नीती

-विजय वहाडणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)