नगर – पक्ष हा परिवार असल्याने घरातील वाद घरातच मिटविण्यात येतील. कार्यकर्त्यांना पक्षात घेतांना वरिष्ठ व स्थानिक पातळीवर चर्चा करूनच प्रवेश देणार असून, प्रत्येक तालुक्‍यांमध्ये व जिल्हा पातळीवर नव्याने कार्यकारिणी करण्यात येणार असून,त्यातून चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे .

त्यासाठी प्रत्येक तालुक्‍यांत चार दिवसांचा दौरा करण्यात येणार आहे.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पूर्वी राष्ट्रवादीचा खासदार निवडून आलेला आहे.त्यामुळे या लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच हक्क आहे. त्यामुळे दक्षिण लोकसभेसाठी पूर्ण ताकदीने पक्ष उतरणार आहे,अशी माहिती नुतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आ. दादाभाऊ कळमकर, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, सरचिटणीस अंबादास गारुडकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, अरुण कडू, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, शारदा लगड, बाळासाहेब जगताप आदी उपस्थित होते.नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी फाळके यांनी राष्ट्र्रवादी भवनात संवाद साधला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात विरोधीपक्ष व भाजपला राष्ट्रवादीच्या माध्यमातून हादरा देणार असल्याचे सांगून आता कोणत्याही लाटेचा प्रभाव राहिलेला नाही . पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविल्याने पदाला न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातल्या विधानसभा व लोकसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे.

आगामी निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी झाली तर ठीक नाहीतर सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी पक्षाने केली आहे. आघाडी न झाल्यास सर्व मतदारसंघात पक्ष ताकद पणाला लावणार आहे. शरद पवारांसोबत गेल्या 29 वर्षांपासून काम करत असल्याने तसेच वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाला बळ दिल्याने पक्षश्रेष्ठींनी विश्‍वास दाखविला जिल्हा मोठा असल्याने काम करणे आव्हानच आहे.

तसेच दक्षिणेतील 6 पैकी 2 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघ बदलण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून, पक्ष देईल ते काम करणार आहोत. नाराजांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)