नगर मनपा निवडणूक : स्वबळाच्या घोषणा हवेतच…

 ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ चा प्रयोग रंगण्याची चिन्हे

नगर – महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याच्या घोषणा उच्च स्वरात केल्या. मात्र निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे सर्वच पक्षांना वास्तवाचे भान होत असून आता युती आघाडीसाठीची कुजबूज सुरु झाली आहे. त्यामुळे मनपाच्या निवडणुका स्वबळावर नव्हे तर युती आघाडीच्या माध्यमातूनच लढल्या जातील असे चित्र निर्माण होऊ लागले आहे. नजिकच्या काही दिवसात “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ चे प्रयोग रंगल्यास आश्‍चर्य वाटू नये.

दोन महिन्यांपूर्वी निवडणुकीची चाहूल लागताच सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा देत शक्‍तिप्रदर्शन घडविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अन्य पक्षातून आपल्या पक्षात इनकमिंग कसे वाढेल यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले. त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात कोण कोणाचे किती मासे गळाला लावतो, याबाबत चढाओढ सुरु होती. सगळ्याच पक्षातल्या जहाजांच्या शिडांमध्ये हवा भरल्याचे पहायला मिळत होते. मात्र प्रभाग रचना जाहीर झाली तशी सगळ्याच पक्षाच्या शिडातील हवाही निघून गेली.

-Ads-

नव्याने निर्मिती झालेल्या 17 प्रभागांमधून आलेल्या हरकतींना वाटाण्याच्या अक्षता लावत प्रशासनाने ज्या प्रभागाच्या सीमारेषा अस्पष्ट होत्या त्या जुजबी हरकती स्वीकारुन केलेल्या प्रभाग रचनेवर शिक्‍कामोर्तब केले. 20 हजार मतदारांचा एक प्रभाग झाला. त्यात 4 लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. यामुळे नवख्या इच्छुकांची तारांबळ तर झालीच शिवाय विद्यमान नगरसेवकांचेही धाबे दणाणले आहे. मुळात प्रभागांचा विस्तार झाला, मतदारांची संख्या वाढली.

मात्र उमेदवारांचा स्वत:चा संपर्क कमी पडू लागल्याने एरवीच्या निवडणुकांची गणिते या निवडणुकीत मांडताना आता त्यांची दमछाक होऊ लागली आहे. तसेच सुरुवातीला स्वबळाचा नारा देणारे नेतेही 68 उमेदवार कोठून आणायचे या विवंचनेत पडले आहेत. प्रत्येक प्रभागात सक्षम चार उमेदवार देणे व मोठ्या मतदार संख्येवर प्रभाव असलेले उमेदवार शोधणे सगळ्याच पक्षांना जिकिरीचे होऊ लागले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात सगळ्याच पक्षांना आवळ्या-भोपळ्याची मोट बांधण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

एकूणच सक्षम उमेदवारांची वानवा ही सगळ्याच पक्षांना जाणवत असल्याने आता प्रभागनिहाय समीकरणे इच्छुक उमेदवारांकडून बांधली जात आहेत. या समिकरणांना पक्ष, यापूर्वीचे राजकीय मतभेद, असे कुठलेही कंगोरे नसल्याने ही प्रभागनिहाय समीकरणे सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरु पहात आहे. या सगळ्या गोष्टींवर एकच उपाय आहे तो म्हणजे व्यक्‍तिगत समीकरणे निर्माण होण्याअगोदर पक्षीय पातळीवरची समीकरणे निर्माण करणे होय. याला पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने महत्व येऊ लागले आहे.

शिवाय स्वबळावर लढून प्रभागनिहाय समीकरणे प्रबळ ठरल्यास सत्ता स्थापनेच्या वेळीही ती मोठी डोकेदुखी ठरु शकते. शिवाय घोडेबाजारालाही त्यातून वाव मिळू शकतो. त्यामुळे सध्या पितृ पंधरवडा सुरु असताना राजकीय हालचाली काहीशा थंडावल्याने पक्षीय पातळीवर समेट घडविण्याच्या चर्चेला अत्यंत मुत्सद्देगिरीने तोंड फोडले जात आहे.

शिवसेनेतील वरिष्ठ मंडळी नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेली होती. त्यावेळी दोन्ही बाजूने युती करण्यासंदर्भात खडा टाकून पाहण्यात आला तर कॉंग्रेस पक्षाच्यावतीने सध्या सुरु असलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप नगर शहरात होणार असून त्या निमित्ताने झालेल्या नियोजन बैठकीच्या वेळी विरोधी पक्षनेत्यांनी इच्छुक उमेदवारांकडून गर्दी जमविण्यासंदर्भात चाचपणी केली. मात्र त्यावेळी मिळालेल्या प्रतिसादातून त्यांनाही मनपा निवडणुकीतील वास्तवाचे भान आले असावे. हीच गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या बाबतीतही घडली.

त्यात पक्षाचे शक्‍तिकेंद्रप्रमुख विरोधकांच्या विकेट घेतील अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली. मात्र ही घोषणा करताना त्यांनी विधानसभेचा आणि लोकसभेचा उल्लेख केला. मात्र महापालिकेचा उल्लेख करणे त्यांनी सोयीस्कररीत्या टाळले. यातूनच शहरातील प्रमुख पक्षांची आगामी मनपा निवडणुकीतील दशा आणि दिशा स्पष्ट होते. नवरात्रौत्सव अवघ्या तीन चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. पितृ पंधरवडा संपताच युती आघाड्यांच्या समेटाला सुरुवात होईल अशी कुजबूज सर्वच पक्षांतून ऐकायला येत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)