शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यास शासन प्रयत्नशीलः ना. शिंदे

पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

नगर – कृषीपूरक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देवून त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. येथील पोलीस कवायत मैदानावर स्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण ना. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, उपाध्यक्षा राजश्री घुले, सहायक जिल्हाधिकारी प्राजित नायर, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

ना. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. त्यानंतर पूर्व प्राथमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ना. शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्या आले. तसेच पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड अशी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ना. शिंदे यांच्या हस्ते यावेळी हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरणाचे उद्‌घाटन करण्यात आले.

ना. शिंदे म्हणाले, यंदा पावसाने जुलै महिन्यात उघडीप दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, येत्या काळात समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत अठराशे कोटींचे खरीप कर्ज वाटप बॅंकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्रति कुटुंब दीड लाख मर्यादेपर्यंत लाभ देय होता. आता कुटुंबाच्या प्रत्येक पात्र सदस्याला या योजनेच्या कर्जमाफीसंबंधी इतर निकषांच्या अधीन राहून लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात कापसावरील बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील 1 लाख 27 हजार शेतकऱ्यांना 157 कोटी 23 लाख रुपयांची मदत दिली जाणार असून प्राप्त 83 कोटी 72 लाख अनुदानाचे वितरण करण्यात येत आहे. कांदाचाळ, शेततळे, अस्तरीकरण, नियंत्रित शेती अशा माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक आधार बळकट करण्याचेच राज्य शासनाचे धोरण असल्याचे यावेळी प्रा. शिंदे यांनी नमूद केले.

ना. शिंदे म्हणाले, शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत मदत करण्यात येत आहे. मराठा विद्यार्थ्यांना छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून 602 अभ्यासक्रमांसाठी 50 टक्‍के शैक्षणिक परतावा, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाजातील तरुण उद्योजकांना व्याज परतावा तत्वावर सुलभ कर्ज देणारी योजना सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, ईबीसीसाठी गुणांची मर्यादा 50 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयांची कठोर अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश राज्य शासनाने दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते आणि प्रशासकीय इमारत येथे उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)