पाथर्डीत नियोजनाअभावी मोफत पास योजनेचा फज्जा

पाथर्डी – परिवहन महामंडळाच्या पाथर्डी आगारातील गलथान कारभारामुळे शासनाच्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याच्या योजनेचा फज्जा उडाला आहे. विद्यार्थ्यांसाठीची मोफत पास, नियमीत पास, तिकीट आरक्षण, चौकशी अशा विविध कामासाठी बस स्थानकात एकच कर्मचारी व एकच खिडकी उपलब्ध आहे.

मोफत पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा बुडवून तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. मोफत पास देताना एका दिवशी फक्त शंभर पासचे वाटप करण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना दिवसभर रांगेत उभा राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शाळा उघडून आठ दिवस झाले मात्र एसटी महामंडळाकडून निम्म्याच विद्यार्थ्यांना मोफत पासचे वाटप करण्यात आले आहे. शेकडो विद्यार्थी मात्र दररोज शाळा बुडवून फक्त पास मिळवण्यासाठी महामंडळाच्या दारात चकरा मारत आहेत.

शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरून जून महिन्यापासून आत्तापर्यंत नियमितपणे एसटी बसचा पास काढला आहे त्यांच्यासाठी दिवाळीनंतर परीक्षा होईपर्यंत मोफत पास देण्यात येत आहेत. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना या योजनेमुळे दिलासा मिळणार असला तरी एसटी महामंडळाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पास वाटप खिडकी वेळेत उघडली जात नाही. तर वेळ संपण्यापूर्वीच बंद केली जाते. कर्मचारी वाटेल तेव्हा येतात वाटेल तेव्हा जातात, समोर रांगेत उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.

“ज्या विद्यार्थ्यांनी जून महिन्यापासून पैसे भरून पास काढलेले आहेत त्यांच्यासाठीच परीक्षा होईपर्यंत मोफत पास योजना आहे. मोफत पासचे प्रत्येक महिन्याला नूतनीकरण करावे लागणार आहे . त्यामुळे सर्व पासची एकाच दिवशी मुदत संपून नूतनीकरण करताना गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही एका दिवशी शंभर पास वाटण्याचा निर्णय घेतला आहे. मोफत पासचे अंदाजे सतराशे विद्यार्थी आहेत. नऊशे विद्यार्थ्यांना आतापर्यंत मोफत पास वाटप करण्यात आले आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी एकच खिडकी होती, मात्र आजपासून दोन काऊंटर सुरू करण्यात आले आहेत.
– पी .पी.दिवाकर, आगारप्रमुख पाथर्डी

अशा अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. परिवहन महामंडळाशी निगडित असलेल्या विविध कामासाठी व पास वाटपासाठी बस स्थानकात एकच खिडकी सुरू आहे. तेथेच मोफत पासचेही वाटप करण्यात येत आहे. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांची पास काढण्यासाठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे रांगेत अनेकवेळा नंबरवरून गोंधळ होतो.

एका दिवसात फक्त शंभर पास देण्याचा अजब आदेश आगारप्रमुखांनी दिल्याने दररोज शेकडो मुलांना शाळा बुडवून रांगेत उभा राहूनही पास मिळत नाही. नंबर लागत नाही म्हणून सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थी पास वाटप खिडकीच्या समोर रांगा लावून असतात. मोफत पास पदर खर्चाने देत असल्याच्या अविर्भावात कर्मचारी वागत असून वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना अरेरावीची भाषा वापरली जात आहे.

परिवहन महामंडळाच्या पाथर्डी आगारातील ढिसाळ नियोजनामुळे शेकडो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाथर्डी आगाराची उदासीन धोरण त्यात अपूर्ण कर्मचारी पास वाटपासाठी एकच खिडकी अशा अनेक कारणाने मोफत पास वाटप योजना अडचणीत आली आहे. याबाबत आम आदमी पार्टीचे संघटक किसन आव्हाड व सामाजिक कार्यकर्ते सुनील पाखरे यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना सुलभ पास देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)