आरक्षणाची बैठक कराड यांनी दोन मिनिटात गुंडाळली

पाथर्डी – वंजारी समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवानगडावर येऊन मंदिरामध्ये कार्यकर्त्यांबरोबर घेतलेली बैठक अवघी दोन मिनिटात गुंडाळली. कराड यांची भगवानगडावर बैठक होऊ देऊ नये, अशी मागणी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रशासनाकडे केल्यानंतर प्रशासनाने जमावबंदी आदेश गडावर लागू केला होता. मात्र, बैठक घेतली असून वंजारी समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीचे आंदोलन आतापासून सुरु झाल्याचे पत्रकारांशी बोलताना कराड यांनी जाहीर केले.यावेळी नामदेव शास्त्री यांच्यावर सुद्धा कराड यांनी टीका केली.

वंजारी समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भगवानगडावर कराड हे बैठक घेणार असून ती रद्द करावी, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केली होती. हि मागणी करताना कराड यांची हि कृती म्हणजे हा एका राजकीय कटाचा भाग असून या मागे ना.पंकजा मुंडे यांचा हात असल्याचा आरोप मुंडे यांचा नामोल्लेख टाळून नामदेव शास्त्री यांनी केल्याने आज भगवानगडावर नेमके काय होणार याकडे भगवानबाबा भक्‍तांचे लक्ष लागून राहिले होते.

शुक्रवारी सकाळपासूनच गडाकडे येणाऱ्या दोन बाजूच्या रस्त्यावर व भगवानगडावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी साडेबाराच्या दरम्यान कराड हे जवळपास दीडशे कार्यकर्त्यांसमवेत गडावर दाखल झाले. कोणतीही घोषणाबाजी न करता ते गडावरील मंदिरात शांततेत गेले व बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारातच त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

आजपासून वंजारी समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीचे आंदोलन सुरु झाल्याचे जाहीर करत बैठक आटोपती घेतली. यानंतर गडाच्या बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कराड म्हणाले, वंजारी समाजाला एन.टी.मध्ये टाकल्याने केवळ दोन टक्‍के आरक्षण मिळाले असून त्यामुळे वंजारी समाजावर अन्याय झाला आहे.पुन्हा एकदा आमचा समावेश ओ.बी.सी.त करावा. भगवानबाबा आमचे आराध्य दैवत असल्याने त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व मंदिराच्या आवारात बैठक घेऊन आंदोलनाला सुरवात केली आहे. या आंदोलनाला कोणाही राजकीय नेत्याचा पाठिंबा नसून पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या आहेत. या विषयावर मी त्यांच्याशी एक शब्द सुद्धा बोललेलो नाही. आम्ही आमच्या पद्धतीने लढत आहोत. मराठा समाजाचे आंदोलन सुद्धा नेत्याशिवाय झाले आहे. सरकार जरी आमचे असले तरीही त्यांनी लवकर आरक्षण द्यावे, अन्यथा आमच्या पद्धतीने ते मिळवू. आंदोलनाची सुरवात गडावरून सुरु करताना गडावर वाद निर्माण करण्याचा आपला हेतू नाही.

गडावरील व्यासपीठ नामदेव शास्त्री यांनी पाडत येथे माईक बंदी करून स्वतःची आचारसहिंता लागू केली आहे. मी येथे मते मागण्यासाठी आलेलो नाही. एखाद्या गावात पाटलाच्या वाड्यावर बैठक होऊन तेथे सुद्धा मते मागितली जातात. मात्र त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत नाही. मग मी बैठक घेतली तर भंग कसा होतो. गडावर होणारा दसरा मेळावा नामदेव शास्त्री यांनी बंद केला. मग वंजारी समाज आरक्षणाच्या विषयावर ते येथे मेळावा घेऊन देणार नाही. हे न समजण्या इतका मी दुधखुळा नाही. मात्र, एक दिवस असा येईल, की वंजारी समाजाचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावर आरक्षणाच्या मागणीसाठी उतरल्यानंतर स्वतः नामदेवशास्त्री या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसेल. यावेळी गोविंद शिंगारे, अंकित मुंडे, परमेश्वर मुंडे, बाळू आढाव, सुनील गर्जे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनात सहभागी व्हायला मी काही राजकारणी नाही

एखाद्या समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनात सहभागी व्हायला मी काही राजकारणी माणूस नसल्याचा टोला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी कराड यांचा नामोल्लेख टाळून लगावला. नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगड हा जातीपातीच्या विरहित आहे. हा गड केवळ एका समाजाचा नसून तो सर्व समाजाचा आहे. या ठिकाणी बैठका घेऊन किंवा मेळावा आयोजित करून कोणीही गडाच्या शांततेचा भंग करू नये.देवस्थान व भगवानबाबांच्या भक्तांना वेठीस धरणे पूर्णपणे चुकीचे असून तो एक प्रकारचा अपराध आहे. एखाद्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गड नसून तो शुद्ध वारकऱ्यांचा आहे.हे ठिकाण सामाजिक नसून ते अध्यात्मिक आहे. वंजारी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी भगवानगडावर मेळावा आयोजित केला असल्याचे आपल्याला वृत्तपत्रातील बातम्यातून समजल्याने प्रशासनाला मेळावा होऊ देऊ नये असे पत्र दिले. आज प्रशासनाला मोठा ताण सहन करावा लागला असून प्रशासनाने गडाला जी साथ दिली. त्याबद्दल मी प्रशासनाचा आभारी असल्याचे शास्त्री म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)