कोणीही माझा बाल बाका करू शकत नाही- ना. मुंडे

नगर जिल्हा शतप्रतिशत बालेकिल्ला करणार : आ. कर्डिलेच्या मतदारसंघातील विकास कामांचा लोकार्पण

पाथर्डी – कोणी कितीही आरोप केले, कोणी काहीही केले तरी आमच्यावर काहीही फरक पडत नाही. जोपर्यंत तुमच्या आशीर्वादाची कवचकुंडले व सत्याची ढाल माझ्याकडे आहे. तोपर्यंत कोणीही माझा बाल बाका करू शकत नाही. स्व.गोपीनाथ मुंडे यांचा बीड जिल्हा बालेकिल्ला आहे. आता नगर जिल्हाही शतप्रतिशत बालेकिल्ला केल्याशिवाय राहणार नाही, असा यलगार ग्रामविकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी चिचोंडी येथे दिला.

राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघातील चिचोंडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे 66 कोटी रुपये निधीच्या कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा ना.मुंडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार दिलीप गांधी, आ. शिवाजीराव कर्डिले, आ.मोनिकाताई राजळे, आ.बाळासाहेब मुरकुटे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, अमित पालवे, सुभाष पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, अक्षय कर्डिले, संदीप कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. मुंडे म्हणाल्या, जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तेराशे 61 किलोमीटर रस्ते करणार असून यासाठी 775 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.यामधून 214 रस्ते पूर्ण होणार आहेत. राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघात 120 किलो मीटरचे 27 रस्ते मंजूर करण्यात आले आहेत.असे सांगून त्या म्हणाल्या की, आज महाराष्ट्रमध्ये एकीकडे डल्ला मारणारांचा हल्लाबोल होतोय. संघर्ष निघत आहेत. संघर्ष यात्रा तुम्हाला शोभत नाही, सत्तर वर्ष सत्ता उपभोगताना तुमचा संघर्षांशी कधी संबंध आला नाही. संघर्ष जगला पाहिजे. तो भोगला पाहिजे. तेव्हा जनता तुम्हाला साथ देत असते. मात्र इकडे हजारोच्या संख्येने लोक सभेला आले. त्यातून जनता किसके साथ है हे सिद्ध होते.

संघर्ष यात्रेची सुरुवात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केली. जनतेचा संघर्ष रस्त्यावर मांडून त्यांच्या प्रश्नाला वाट करून दिली. वीस-पंचवीस वर्षांपासून प्रलंबित राहिलेले प्रश्न स्व.मुंडे यांनी मार्गी लावले. त्यानंतर 14 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला वनवास सहन करावा. लोकांना प्यायला पाणी नाही, वीज नाही, रस्ते नाही, शौचालय नाही, हाताला काम नाही, ही सर्व परिस्थिती कशामुळे निर्माण झाली. सत्तर वर्ष ज्यांनी राज्य केले. त्यांनी जनतेला काही दिले नाही. त्यांना संघर्ष यात्रा काढण्याचा अधिकार नाही.

ना. मुंडे म्हणाल्या नगर जिल्ह्यामध्ये 995 टॅंकर सुरू होते. बीड जिल्ह्यामध्ये 999 टॅंकर सुरू होते. सत्ता परिवर्तन झाले जलयुक्त शिवार योजना भाजप सरकारने आणली. जलयुक्‍त शिवार योजनेमुळे गेल्या दोन वर्षात नगर जिल्ह्यासह राज्यातील टॅंकरची संख्या नगण्य राहिली आहे. मागचा सरकारने नेमके केले काय काम केले. हा कशावर हल्ला आहे. हा प्रश्‍न जनता येणाऱ्या निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही. अडवा आणि जिरवा हे धोरण पाण्यासाठी होते, मात्र राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सरकारने हे धोरण जनतेसाठी वापरले. जो आमच्या बरोबर येत नाही. त्याला आडवा आणि त्याची जिरवा हे धोरण अवलंविले. आम्ही सत्ता आल्यानंतर पाणी आडवा पाणी जिरवा, या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला व पिण्याला मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 30 हजार किलोमीटरचे रस्ते राज्यात तयार करत आहोत. असे त्या म्हणाल्या.

2015 ते 2020 पर्यंत नगर जिल्ह्यातील रस्त्यांचा आराखडा तयार केला आहे. 1361 किमीचे रस्ते आम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येणार आहे. स्व. मुंडे असते तर मी मंचावर नसते, शिवाजीराव कर्डिले मंत्रिमंडळात असते. स्व. मुंडे यांच्या निधनानंतर लोकांच्या डोळ्यातील नेत्याचा शोध संपवण्यासाठी मी स्व. मुंडे यांचे रूप व्हायचे ठरवले. तुम्हाला जर माझ्यात गोपीनाथ मुंडे पाहायचे असतील तर मी तयार आहे. गोपीनाथ मुंडे व्हायला. तुमच्यासाठी म्हणून मी रस्त्यावर आहे. स्व. मुंडे यांनी मला बेरजेचे राजकारण करायचं शिकवले.

संकट काळात आ.कर्डिले यांच्या बरोबर मी राहिले जिथे चूक तेथे चूक व जिथे बरोबर आहे. तिथे बरोबर म्हणायला मी घाबरत नाही. 2019 पर्यंत हा महाराष्ट्र स्वच्छ होणार. राज्यांमध्ये तीस हजार किलोमीटरचे रस्ते होणार, पंतप्रधान आवास योजनेतून सर्वसामान्यांना घरे देणार, महिला बचत गटांचं जाळं निर्माण करून त्यांना कर्ज देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम करतो आहोत. महिलांनी बचत गटांसाठी घेतलेले कर्ज शंभर टक्‍के फेडलेले आहे. त्यांना बक्षीस म्हणून पुढील काळात झिरो टक्‍के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे, असे ना. मुंडे म्हणाल्या. आ. शिवाजीराव कर्डिले यांनी प्रास्ताविक केले.सुत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी तर वैभव खलाटे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
61 :thumbsup:
55 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)